
आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. मानवी अस्तित्व भविष्यात टिकवून ठेवण्यासाठी आज आपण पर्यावरणाची काळजी घेणं काळाची गरज आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगच मानवासमोर आव्हान आहे. या ग्लोबल वॉर्मिंगचे वातावरणावर परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे पर्यावरणाच संतुलन ढासळत चाललं आहे. पृथ्वीच तापमान वाढतय. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन प्रमुख ऋतुंमध्ये अनेक बदल दिसून येत आहे. याच ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करायची असेल, तर प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेणं हाच मार्ग आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सागर गोपीनाथ बोराटे हा युवक याच प्रेरणेतून पर्यावरणासाठी काम करत आहे. ‘मिशन ग्रीन मुंबई’ संस्थेच्या माध्यमातून त्याचं कार्य सुरु आहे.
आपण प्रकल्प किंवा विकासाच्या नावाखाली जी 200-500 वर्ष जुनी झाडे तोडतो, ती पुनः कधीच आपल्याला मिळणार नाहीत. एक झाड उगवायला प्रौढ अवस्था प्राप्त होण्यास पाच ते दहा वर्षे जातात. पण तीच कापायला एक तास पुरेसा असतो. आता ‘मिशन ग्रीन मुंबई’ संस्थेच्या माध्यमातून आंब्याच्या कोया (बाटे/बिया) जमा करण्याच काम सुरु आहे. “लोकांकडून या आंब्यांच्या बिया घेतल्यानंतर त्या बियांची लहान, लहान कुंड्यांमध्ये लागवड करतो. या बियांपासून मोठे रोप तयार होण्याची ही संपूर्ण प्रोसेस एक वर्षांची असते. आपल्याला लोकांकडून प्राप्त होणाऱ्या या बियांची योग्यरित्या लागवड करतो. पण झाडावर अथवा बियांवर झालेल्या जेनेटिक इंजीनियरिंग मुळे किंवा रोपांमध्ये असलेल्या कुचकामी रोगप्रतिकारक शक्तीमुळे काही बिया उगवण्या आधीच मरतात” असं सागर बोराटेने सांगितलं.
हा एक सामाजिक उपक्रम
आंब्याच्या बरोबरीने फणस, चिंच, जांभूळ यांच्या बिया सुद्धा गोळा केल्या जात आहेत. हा एक सामाजिक उपक्रम आहे. या बिया यावर्षीच्या पावसाळ्यात ओल्या मातीत खोल रुजतील आणि मोठे वटवृक्ष निर्माण करतील. याच वटवृक्ष्याचा गंध भविष्यातही अनेक पिढ्यान सुगंध देत राहतील.