
तुम्ही अनेकदा चित्रपटांच्या कथांमध्ये पाहिले असेल की, बऱ्याच वर्षांनंतर दोन भावांची भेट होते. त्यानंतर सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. मात्र अशी घटना प्रत्यक्षात बुलढाण्यातील खामगावमध्ये घडली आहे. बुलढाण्यात दोन भाऊ तब्बल 55 वर्षांनी एकमेकांना भेटले आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पहायला मिळाले. ही घटना नेमकी काय आहे? हे दोन भाऊ नेमके कसे भेटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जर एखादा व्यक्ती 55 पूर्वी घर सोडून गेलेला असेल तर तो पुन्हा सापडण्याची शक्यता जवळपास नसतेच. मात्र बुलढाण्यातील खामगावमध्ये अशी घटने घडली आहे. ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी खरी कहाणी आहे. केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा व्यक्ती वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी घरातील वादामुळे रागाच्या भरात घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर तो केरळमध्ये मिळेल ते काम करत राहिला.
तब्बल 55 वर्षे केरळमध्ये काम केले, विशेष म्हणजे, आपल्या कष्टाची कमाई तो स्वतःसाठी न वापरता अनाथाश्रमाला दान करत होता. आयुष्यभर परक्यांसाठी जगणारा हा माणूस मात्र स्वतःच्या नात्यांपासून दूर राहिला. वय वाढत गेले, शरीर थकत गेले आणि आपल्याला सांभाळणारा कोणीच नाही, ही जाणीव बोचू लागली. त्याच भावनेतून तो केरळहून रेल्वेने मुंबईच्या दिशेने निघाला. आता आपले नातेवाईक आपल्याला भेटणारच नाही, या विवांचनेत प्रवासादरम्यान नांदुरा रेल्वे स्टेशनच्या पुढे गाडी निघाल्यानंतर त्याने गाडीतून अचानक उडी मारली. या घटनेत तो रेल्वे ट्रॅकवर पडला आणि गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिकी मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला सामान्य रुग्णालयात भरती केले. पाच दिवसांनंतर हा व्यक्ती शुद्धीवर आला. त्यानंतर रमेश अवचार या कर्मचाऱ्याने या व्यक्तीची विचारपूस केली. अधिक माहिती काढल्यानंतर या व्यक्तीच्या नातेवाईकांचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर नातेवाईकांना रुग्णालयात बोलावले आणि त्यांची भेट घालून दिली. यावेळी रुग्णाच्या भावाच्या आणि नातेवाईकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू तरळले होते. तब्बल 55 वर्षांनंतर आपला भाऊ पुन्हा भेटेल असं या दोघांनाही वाटलं नव्हतं. मात्र आता हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटले आहेत.