ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत आहात? तर अमरावतीची ही बातमी तुमच्यासाठी इशारा!

| Updated on: Jan 15, 2021 | 8:08 PM

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील 37 इच्छुक उमेदवार आणि 13 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत आहात? तर अमरावतीची ही बातमी तुमच्यासाठी इशारा!
Follow us on

अमरावती: राज्यातील 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस बाकी आहे. अशावेळी अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण ३७ उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर 13 निवडणूक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. (37 candidates in Gram Panchayat elections in Amravati district are corona positive)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. त्यावेळी जिल्ह्यातील 37 इच्छुक उमेदवार आणि 13 निवडणूक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मेळघाटमधील एकट्या धारणी तालुक्यात तब्बल 27 उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचं चाचणीनंतर स्पष्ट झालं आहे. तिवसामध्ये 8 तर अमरावतीमध्ये 7 उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्व कोरोनाबाधित उमेदवारांना 17 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण 553 ग्रामपंचायतींची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण 3 हजार 547 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना या उमेदवारांना कोरोना चाचणी केल्याचा अहवालही द्यावा लागत आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर जिल्ह्यातील एकूण 37 उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह उमेदवार, पॅनल प्रमुख आणि उमेदवारांच्या कुटुंबियांना मोठी चिंता लागून राहिली आहेत.

‘त्या’ उमेदवारांचा प्रचार कोण करणार?

कोरोना पॉझिटिव्ह उमेदवाराच्या प्रचारासाठी उमेदवाराने निवडलेल्या व्यक्तीची नेमणूक करुन प्रचार करण्यास जिल्हा निवडणूक विभागानं परवानगी दिली आहे. कोरोना काळात निवडणुका होत असल्यानं योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग सज्ज झाल्याचं अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

तुम्ही ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत आहात?

अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं राज्यभरात चिंतेचं वातावरण आहे. कारण राज्यातील 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे. अशावेळी आपल्या जवळचा एखादा उमेदवार, मतदार किंवा अधिकारी पॉझिटिव्ह असू शकतो. त्यामुळे सर्वसामान्य उमेदवार आणि मतदारांनी काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

37 candidates in Gram Panchayat elections in Amravati district are corona positive