गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार
msrtc run extra bus for ganesh festival
| Updated on: Aug 07, 2026 | 4:14 PM

मुंबई : यंदा श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी आता एसटी ( महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ) सज्ज झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी मोठा जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, मुंबईतील कोकणचे रहिवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे ५,२२० जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत.”

या जादा बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने ५,२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या सेवेला भाविक व प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१० ऑगस्टपासून गट आरक्षणास प्रारंभ

किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे संचालन करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात एसटीची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us