गडचिरोलीत बोट उलटल्याने मिरची तोडणीसाठी निघालेल्या 6 महिला पाण्यात बुडाल्या

गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिरची तोडण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला वाचवण्यात यश मिळालं.

गडचिरोलीत बोट उलटल्याने मिरची तोडणीसाठी निघालेल्या 6 महिला पाण्यात बुडाल्या
| Updated on: Jan 24, 2024 | 12:50 PM

गडचिरोली | 24 जानेवारी 2024 : गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिरची तोडण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला वाचवण्यात यश मिळालं. मंगळवारी वैनगंगा नदीच्या गणपुर नदी घाटावरून ही नाव निघाली होती. मात्र अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदीच्या मध्यात येताच ही नाव उलटली आणि त्यातील सर्व महिला पाण्यात बुडाल्या. नावाडी आणि आणखी एका महिलेला वाचवण्यात यश मिळालं मात्र इतर पाच जणींचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

मंगळवारी चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही दुर्घटान घडली असून त्यामुळे एकच खळबळ माजली. गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपूर रै परिसरातील या महिला चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची तोडणीसाठी जात होत्या. 23 जानेवारीला, मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे या महिलांना घेऊन नाव जात होती. मात्र, ऐन मध्यात येताच नाव नदीपात्रात उलटली. त्यामुळं त्या महिला आणि नावाडी पाण्यात पडले. नावाडी पोहून कसाबसा बाहेर पडला. तसेच एका महिलेलाही वाचवण्यात यश मिळालं. मात्र उर्वरित सहा महिलांना पोहून बाहेर येता न आल्याने त्या बुडाल्या.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाण्यात बुडालेल्या महिलांपैकी दोघींचे मृतदेह हाती लागले आहेत, मात्र उर्वरित चार महिलांचा शोध अद्याप बाकी आहे. शोधमोहीम वेगात सुरू आहे.