फर्निचर कामाच्या नावाखाली बेडरुम-बाथरुममध्ये लावले कॅमेरे, 22 वर्षीय तरुणीला कळताच… आक्षेपार्ह्य व्हिडीओ वापर करण्याचा प्रयत्न

अकोला येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. फर्निचरचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने अनेक घरांमध्ये छुपे कॅमेरे लावले होते. हे कॅमेरे बाथरुम, बेडरुममध्ये लावले होते. त्याने आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करुन चुकीचा वापर केला. त्यानंतर महिलांनी पोलिसात धाव घेतली.

फर्निचर कामाच्या नावाखाली बेडरुम-बाथरुममध्ये लावले कॅमेरे, 22 वर्षीय तरुणीला कळताच... आक्षेपार्ह्य व्हिडीओ वापर करण्याचा प्रयत्न
अकोला
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 8:45 AM

अकोला शहरात महिलांच्या सुरक्षेला हादरा देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरांमध्ये फर्निचरचं काम करण्याच्या बहाण्याने बेडरूम आणि बाथरूममध्ये कथितरित्या छुपे कॅमेरे बसवले जायचे. त्यानंतर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून त्याचा वापर धमकावण्यासाठी आणि लैंगिक छळासाठी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अकोल्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संबंधित कारपेंटरला पकडून पोलिसांच्या हवाली केल असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित कारपेंटरच्या दोन मोबाइलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. यामध्ये काही कुटुंबातील पती-पत्नीच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे.

आरोपी मूळचा बंगालचा

मोतीऊर रहेमान शेख असं आरोपीचं नाव असून तो पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात चार महिला आणि एका 22 वर्षीय युवतीच्या लैंगिक शोषणाचा आरोप समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे. आरोपीच्या नागरिकत्वाबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील एका 30 वर्षीय महिलेने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या मोबाईलमध्ये अढळले अनेक व्हिडीओ

पोलिसांनी आरोपीचे दोन मोबाइल जप्त केले असून त्यातील व्हिडीओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. आरोपीने आणखी किती महिलांचे अशाप्रकारे व्हिडीओ तयार केले आणि त्यांचा छळ केला, याचा तपास आता पोलीस करत आहे. मात्र, छुप्या कॅमेऱ्यांचा हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित सोसायटीसह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत आणि सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us