सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले…

भास्करराव जाधव हे स्वभावाने कडक आणि प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली, वावगे वागले तर ते थेट जाहीरपणे पानउतारा करतात, त्यांनी प्रसंगी नेतृत्वाला देखील बोल सुनावले आहेत. पण आजच्या प्रसंगाने त्यांची एक वेगळाच हळवा पैलू सर्वांसमोर आला.

सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले...
| Updated on: May 01, 2025 | 4:23 PM

शिवसेनेची कोकणातील मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे भास्करराव जाधव हे विरोधकांना नेहमीच पुरुन उरतात. त्यांच्यातील लढवय्या नेता नेहमीच दोन हात करायला तयार असतो… अशा भास्करराव जाधव यांच्या कडक स्वभावातील एक हळवा क्षण पुन्हा पाहायला मिळाला. निमित्त होते सुप्रियाच्या लग्नाचे…ते सर्व आपले सर्व कार्यक्रम रद्द करून पत्नी, मुले, पुतणे, सुना अशा संपूर्ण कुटुंबासह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्न मुहूर्तावर पोहोचले. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागले. शुभमंगलम सावधान झाले आणि अक्षता पडल्या..लेक जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा मात्र जाधव यांच्या गालावरुन अश्रु ओघळू लागले…

गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी त्यांच्याघरी गेल्या ८ वर्षांपासून काम करीत होती. तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा यामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले आणि आमदार भास्करराव जाधव यांच्या कुटुंबांची ती लाडकी लेकच बनली आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच तिचे लग्न लावून तिला तिच्या घरी पाठवले…

ही लक्ष्मी आहे तुमच्या घराची भरभराट करेल…

लग्न लागले त्यानंतर जेव्हा मुलगी सासरी जाऊ लागली तेव्हा निरोप देताना मात्र भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने त्यांची पत्नी सुवर्णाताई आणि सून स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. तेव्हा मात्र भास्करराव यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही वेळाने स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, ‘सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.’लेकीला सासरी जाताना निरोप देताना त्यांनी चांगला सुखाचा संसार कर असा आशीवार्द दिला…