
मनोज लेले, रत्नागिरी, दि.18 जानेवारी 2024 | शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. आमदार रवींद्र वायकर यांची अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी केलेल्या चौकशीनंतर आता दुसऱ्या आमदाराची चौकशी सुरु झाली आहे. शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांची चौकशी सुरु झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) ही चौकशी गुरुवारी सकाळी सुरु करण्यात आली. या चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर रत्नागिरी आणि रायगड येथील एसीबीचे पथक पोहचले. रत्नागिरी आणि रायगड कार्यालयातील अधिकारी आले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु केली आहे.
राजन साळवी यांच्या जुन्या घरी, सध्या राहत असलेल्या घरी, हॉटेलमध्ये एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचले आहे. एसीबीचे १८ ते २० अधिकारी आले आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली. घरातील एका सदस्याने सांगितले की, यापूर्वी घरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. ते घराचे मोजमाप करुन गेले. आता एसीबीचे अधिकारी आले आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरात कपडे किती आहे, भांडी किती आहे, कागदपत्रांची तपासणी करत आहेत, असे घरातील सदस्याने सांगितले. यापूर्वी अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवले होते. आम्ही सहकार्य केले. यामुळे चौकशी संपली असे आम्हाला वाटले होते. परंतु विरोधकांना संपवणे हे काम सध्याच्या सरकारने सुरु केले आहे. राजन साळवी दुसऱ्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले आहेत. ते चौकशीला सहकार्य करणार आहे.
चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. मी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले. अधिकारी कालपासून रत्नागिरीत आले. त्यांच्या प्रत्येक हालचालींची माहिती आपणस मिळत होती. आता ही त्यांनी सुरुवात केली आहे. मी उद्धव ठाकरे सोबत असल्यामुळे ही कारवाई सुरु आहे.