तुम्ही संत्री कशी खाता? अक्षय कुमारचा प्रश्न, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली नागपूरकरांची सिक्रेट पद्धत

मुंबईतील FICCI फ्रेम्स 2025 मध्ये अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. संत्री खाण्याबद्दलच्या मिश्किल प्रश्नावर फडणवीसांनी नागपूरची खास, अनोखी पद्धत सांगितली.

तुम्ही संत्री कशी खाता? अक्षय कुमारचा प्रश्न, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली नागपूरकरांची सिक्रेट पद्धत
| Updated on: Oct 07, 2025 | 4:31 PM

मुंबईत FICCI फ्रेम्स 2025 या कार्यक्रमाच्या 25 व्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेता अक्षय कुमारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांना संत्री खाण्याबद्दलचा मिश्किल सवाल विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही विनोदी शैलीत भाष्य केले.

तुम्हाला संत्री आवडतात का?

अक्षय कुमार यांनी 2019 मध्ये एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही आंबा कसा खाता? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. याच आठवणीला उजाळा देत अक्षय कुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न एका वेगळ्या अंदाजात विचारला. यावेळी अक्षय कुमारने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जेव्हा मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना विचारले होते की तुम्ही आंबा कसा खाता, यावरुन मला अनेकांनी ट्रोल केले होते. पण मी सुधारणारा नाही. तुम्ही नागपुरातील आहात आणि नागपूर हे संत्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला संत्री आवडतात का? तुम्ही ते सोलून खाता की त्याचा ज्यूस बनवून पिता? असे विचारले होते.

फक्त खऱ्या नागपूरकरांना ही पद्धत माहिती

त्यावर देवेंद्र फडणवीसांनी हटके अंदाजात उत्तर दिले. मला संत्री नक्कीच आवडतात. मी आज तुम्हाला संत्री खाण्याची एक नवीन पद्धत सांगतो. तुम्ही संत्री ज्यूस काढून किंवा ते न सोलता खायला हवं. ते मधून कापून घ्या. त्याची साल काढू नका. त्यावर मीठ टाका आणि आपण आंबा ज्याप्रकारे चुपून खातो तशाप्रकारे ते खा. त्याची साल खाऊ नका. पण त्याचा जो रस आहे तो प्या. यामुळे तुम्हाला संत्री खाण्याचा एक वेगळाच फिल येईल. ही पद्धत फक्त खऱ्या नागपूरच्या लोकांनाच माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यानंतर अक्षय कुमारने मला आज नवीन गोष्ट शिकायला मिळाली आहे. मी घरी गेल्यानंतर नक्कीच या पद्धतीने संत्री खाईन, असे म्हटले. दरम्यान FICCI फ्रेम्स 2025 चे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. आज 7 आणि उद्या 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमातून भारत आणि जगभरातील लोक एकत्र येऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.