‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा वाद कोर्टात? रुपाली चाकणकरांचा इशारा, दिपाली सय्यद यांनीही ठणकावलं!
रुपाली चाकणकर यांनी व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशनासाठी माझी स्टाईल वापरल्यास कायदेशीर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलं होते. यावरुन आता अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Dipali Sayyad On Rupali Chakankar Trade Mark: राष्ट्रवादीच्या नेत्या, महिला आय़ोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे, असं जाहीर केले होते.
‘महाराष्ट्राची एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारत असल्याचं बोललं जात आहे. यानंतर रुपाली चाकणकर यांनी व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशनासाठी माझी स्टाईल वापरल्यास कायदेशीर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलं होते. यावरुन आता अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या दिपाली सय्यद?
“आ बैल मुझे मार.. अशी चाकणकरांची अवस्था झालीआहे. तुमच्या घरी आई बहिण सगळेच साड्या नेसतात. क्लिप लावतात. अशी किती तरी लोकं आहेत ज्यांच नाव रुपाली आहे. हे किती हास्यास्पद आहे. रुपाली चाकणकर यांना कोण कायदेशीर सल्ला देत आहे? अजून त्यांनी केलेल्या ट्रेडमार्कला परवानगी मिळालेली नाही. या गोष्टींना न घाबरता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.असं करुन ती व्यक्ती मीच आहे हे तुम्ही सिद्ध करत आहात,” असं अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
“मी कलाकार आहे, कोणतीही व्यक्तिरेखा साकारली आहे, ती लोकांना आवडते म्हणून ते स्विकारली आहे. ती मीच आहे हे तुम्ही बोंबाबोंब करुन सांगत आहात. हे सर्व कोर्टात चालू आहे. त्यांनी आत्ता पाच नोव्हेंबरला हे ट्रेडमार्कसाठी अर्ज टाकला आहे, त्यालाअजून मान्यताही मिळाली नाही.आम्हीही कायदेशीर उत्तर देत आहोत,” असंही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?
“माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल,” असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले होते.