कधी रेल्वेही पाहिली नाही, त्याच अदितीची उत्तुंग झेप; थेट NASA च्या दिशेने प्रवास

तिच्या घरात कोणाकडेही स्मार्टफोन नाही, ना शाळेत सुस्थितीतील कॉम्प्युटर.. म्हणून जेव्हा पुणे जिल्हा परिषदेच्या (ZP) शाळेत शिकणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीची जेव्हा नासा दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा अख्खं गाव हरखलं. जाणून घेऊया अदितीची कहाणी..

कधी रेल्वेही पाहिली नाही, त्याच अदितीची उत्तुंग झेप; थेट NASA च्या दिशेने प्रवास
आदितीचं उत्तुंग यश
| Updated on: Oct 13, 2025 | 1:13 PM

रोज सकाळी 9 वाजता साडेतीन किलोमीटरचा रस्ता तुडवत अदिती पार्थे पुण्यातील भोर तालुक्यातील निगुडाघरजिल्हा परिषदेच्या शाळेत जाते आणि संध्याकाळी 5 वाजले की पुन्हा तेवढंच अंतर चालत तिच्या मामीच्या घरी परत येते. तिचे वडील आणि मामा दोघेही पुण्यातील मार्केट यार्डमध्ये रोजंदारीवर काम करतात, तर तिची आई तिच्या मोठ्या भावासोबत वडिलांच्या गावी राहते. तिच्या घरात ना कोणाकडे स्मार्टफोन , ना शाळेत चांगले कम्प्युटर, मात्र तरीही 12 वर्षांच्या या मुलीची पुणे जिल्हा परिषदेच्या (ZP) या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या नासा दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली, तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. जिल्हा परिषदेकडून राबवण्यात नासा भेटीच्या उपक्रमात तिची निवड करण्यात आली आहे. कठीण परिस्थितीतून वाट काढत काट्याकुट्यांचा रास्ता तुडवत केलेल्या मेहनतील अखेर यश मिळालं. ग्रामीण शाळेत शिकणाऱ्या या हुशार विद्यार्थिनीच्या मेहनतीची दखल घेत तिची निवड नासाच्या ‘स्पेस टूर’साठी करण्यात आली आहे. जिल्हापरिषद शाळेत शिकून तिने हे घवघवीत यश मिळवलं आहे.

इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) च्या सहकार्याने, ऑगस्टमध्ये संपणाऱ्या तीन टप्प्यांच्या चाचण्यांमधून इयत्ता 6 वी आणि 7 वी मधील 75 झेडपी शाळांच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यापैकी 50 विद्यार्थी 6 ऑक्टोबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तिरुअनंतपुरम येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आणि इतर 25 विद्यार्थी नासाला जाणार आहेत. सातवीत शिकणाऱ्या अदिताने आत्तापर्यत ट्रेनही पाहिलेली नाही, ना कधी प्रवास केला. तीच आदिती आता थेट विमानात बसून,सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेतील जगातील अव्वल अंतराळ संस्थेच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी मुंबईहून रवाना होणार आहे.

आनंदाश्रूंनी भरले डोळे

या सुखद बातमीने तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती, पण ते तर आनंदाश्रू होते. “नासा भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये माझी निवड झाल्याचे जेव्हा सरांनी (मुख्याध्यापकांनी) माझ्या मामीला सांगितलं, तेव्हा ती इतकी आनंदी झाली की तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, काय बोलावं तेच तिला कळत नव्हतं. माझी आई सर्वात जास्त आनंदी होती. मी तिला सकाळी 7 वाजता फोन करून सांगितलं की मी अमेरिकेला जाणार आहे. सहसा मीच तिला फोन करते पण तिने त्या दिवशी 15 वेळा मला फोन केला.” अशी आठवण आदितीने सांगितली. नासामध्ये गेल्यानंतर मोठे मोठ्या शास्त्रज्ञांना भेटायला मिळेल,तिथे कायं कामं चालत हे पाहायला मिळेल नासा अंतराळ संस्था प्रत्यक्ष पाहायला मिळेल, याचा आनंद होतं आहे, असंही ती म्हणाली.

हजारो विद्यार्थ्यांमधून झाली अदितीची निवड

पुणे जिल्हा परिषदमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाण्याची संधी मिळाली . 6वी आणि 7 वीत शिकणाऱ्या तब्बल 16 हजार 671 विद्यार्थ्यांनी यासाठी परीक्षा दिली. त्यातून फक्त 25 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली, त्यापैकी एक ठरली ती अदिती. पहिल्या MCQ परीक्षेच्या फेरीसाठी तब्बल 13 हजार विद्यार्थी बसले होते आणि प्रत्येक ब्लॉकमधील पहिल्या 10 टक्के विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली, जिथे त्यांना ऑनलाइन MCQ चाचणी द्यावी लागली. पण शाळेत संगणक नसल्याने, मुख्याध्यापक अशोक बांदल यांनी दुसऱ्या फेरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना संगणक चालवण्याच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक लॅपटॉपचा वापर केला. IUCAA येथे झालेल्या वैयक्तिक मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी 235 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये जीवशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगोल या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. बरेच टप्पे पार केल्यावर अखेर काही निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

“स्थानिक माध्यमांनी तिची निवड झाल्याची बातमी दिल्यानंतर सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला. त्यानंतर अदितीला एक सायकल आणि बॅग देण्यात आल्या आहेत. आम्ही लॅपटॉपची देखील विनंती केली आहे,” असं आदितीच्या शाळेतील शिक्षिका वर्षा कुथवाड यांनी सांगितलं. “अदिती फक्त पुस्तकी अभ्यासात हुशार नाही तर खेळ, वक्तृत्व आणि अगदी नृत्यातही चांगली आहे. तिच्यात काहीतरी वेगळे आहे,” असंही शिक्षिकेने अभिमानाने सांगितलं. अतिदुर्गम डोंगराळ भागात शिक्षण घेत असूनही, हे सर्व टप्पे पार करत आदितीने हजारो विद्यार्थ्यांमधून, ही बाजी मारल्याने तिचे विशेष कोतुक हौत आहे.

मामीने केलं पालनपोषण

आदितीची मामी मंगल कंक हिने तिला लहानपणापासून वाढवले ​​आहे. “आमच्यापैकी कोणीही विमान पाहिलेले नाही, त्यात प्रवास करण्याचा विचार तर दूरच. त्यामुळे ही (आदितीला मिळालेली संधी) आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या गावात, जर तुम्ही शिक्षण घेतले नाही तर कुली बनण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्हाला अशी आशा आहे की आमची मुलं छान शिकतील आणि सरकारी नोकरी किंवा शास्त्रज्ञ बनतील, एका मानाचे पद त्यांना मिळेल” असंही त्या म्हणाल्या.