ठेव रे.. यूट्यूबवर भीक माग, तुझ्या राज ठाकरेला.., गुणरत्न सदावर्तेंची मनसे कार्यकर्त्यासोबत खडाजंगी; रेकॉर्डिंग व्हायरल!

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यात चांगलाच वाद झाला आहे. या वादाची एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे.

ठेव रे.. यूट्यूबवर भीक माग, तुझ्या राज ठाकरेला.., गुणरत्न सदावर्तेंची मनसे कार्यकर्त्यासोबत खडाजंगी; रेकॉर्डिंग व्हायरल!
gunaratna sadavarte and yogesh khaire
| Updated on: Apr 04, 2025 | 9:28 PM

Gunaratna Sadavarte: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सरकारने वेगळे अधिकार दिलेले नाहीत. राज ठाकरेंची टोळकी बँकांत जाऊन धडगूस घालत आहेत, ते थांबलं पाहिजे, अशी भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी याबाबत कायदेशीर लढाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. असे असतानाच आता गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांच्यात खडाजंगी झाली आहे. त्यांच्या या शाब्दिक वादाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

बँकांत मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी

राज्यातील सर्व बॅकांमध्ये मराठीतून व्यवहार झाले पाहिजेत, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बँकांत जाऊन व्यवहार मराठीत होत आहेत, का ते पाहा असा आदेश दिला आहे. त्यानंतर आता मनसेचे नेते आणि कार्यकर्ते राज्यभरातील बँकांत जाऊन तेथील फलक आणि इतर माहिती मराठीतून देण्याची मागणी करत आहेत. तसेच आगामी काही दिवसांत मराठीचा वापर झाला नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू, अशा इशाराही या कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे. यालाच गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यानंतर आता सदावर्ते आणि योगेशस खैरे यांच्यात शाब्दिक वाद झाला आहे.

व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे?

मनेसेचे प्रवक्ते योगेश खैरे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांची एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झाली आहे. या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये योगेश खैरे आणि सदावर्ते यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं दिसतंय. व्हायरल कॉल रेकॉर्डिंगनुसार योगेश खेरे यांनी सदावर्ते यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. त्यानंतर सदावर्ते यांनीदेखील खैरे यांना जशास तसे उत्तर दिले. मी मांडलेली भूमिका योग्य आहे. मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणार आहे, असे सदावर्ते म्हणाले.

फोन ठेव रे, यूट्यूबवर भीक माग

त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून योगेश खैरे यांनी तुमचे कायद्याचे ज्ञान फार कमी आहे, असे म्हणत सदावर्ते यांना डिवचले. त्यानंतर उत्तरादाखल तुमचा ज्ञान काय आहे? राज ठाकरे यांना तुम्ही फोन करा. मला कशाला फोन करता? तू एखाद्या टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव, राज ठाकरे यांनाही कायदा काय असतो ते सांगतो? असा उत्तर सदावर्ते यांनी दिलं. तसेच आता फोन ठेव रे, यूट्यूबवर भीक माग, असे म्हणत सदावर्ते यांनी खैरे यांना डिवचलं.

सदावर्ते आता काय भूमिका घेणार?

दरम्यान, सदावर्ते आणि खैरे यांच्यातील शाब्दिक वादाची ही कॉल रेकॉर्डिंग चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला बँकांमध्ये मराठीचा वापर होत आहे की नाही, ते तपासा असे सांगितले होते. त्यानंतर मनेसच्या कार्यकर्त्यांनी काही बँकांमधील पोस्टर्सची तोड-फोड केल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच मनसेचे अधिकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोलतानाही काही व्हिडीओंमध्ये दिसत आहे. त्यामुळे आता सदावर्ते नेमकी काय कायदेशीर भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.