
मोठी बातमी समोर आली आहे, अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्यू आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून , या डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन अहिल्यानगरच्या पशु वैद्यकीय पथकाने साकुरीसह जिल्ह्यातील इतर काही गावांमधील डुकरांचे तपासणी नमुने गोळा केले आणि ते भोपाळ येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, या डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्यूचे विषाणू आढळून आले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत होत्या, त्यानंतर अहिल्यानगरच्या पशु वैद्यकीय पथकाने साकुरीसह जिल्ह्यातील इतर काही गावांमधील डुकरांचे नमुने मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले होते. साकुरी गावातील डुकरांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले असून त्यांना आफ्रिकन स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मानवी आरोग्यास यापासून धोका नसला तरी साकुरी परिसरातील इतर गावांमध्ये डुकरांचे अनिसर्गिक मृत्यू आढळ्यास, पशु वैद्यकीय पथकास संपर्क करावा असे आवाहन पशु शल्यचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केलं आहे.
काय आहेत लक्षणं?
हा विषाणू सामान्यपणे डुकरांमध्ये आढळतो, हा अत्यंत घातक आणि झपाट्यानं पसरणारा आजार आहे, मात्र आफ्रिकन स्वाईन फ्यू हा मानवामध्ये पसरत नसल्यानं त्याचा कोणताही धोका नाहीये. या आजारामुळे डुकरांच्या मृत्यूदरात वाढ होते, यावर अद्याप तरी कोणतीही खात्रीशील लस किंवा औषध उपलब्ध नाहीये. मात्र हा आजार मानवामध्ये पसरत नाही.