ST Bus Attack : कर्नाटकात ड्रायव्हरला काळं फासल्यानंतर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय
ST Bus Attack : कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. चालकाला आणि एसटीला काळ फासण्यात आलं. या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला केला. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केली. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का ? अशी विचारणा केली. या प्रकारानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमावादाचा प्रश्न आहेच. महाराष्ट्रतून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यानी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेचे हे पडसाद आहेत. ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी दहा नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे. कर्नाटकात एसटी चालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापूरात ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाचं मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कर्नाटक बस अडवून आंदोलन.
सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाववरुन सीमावाद आहे. त्यावरुन दोन्ही राज्यात हिंसक आंदोलनं झाली आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले आहेत. 2022 साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार हल्ला केला होता.
