Delhi Red Fort Blast : सीएसटीला पोलिसांचा वेढा, दिल्लीत स्फोट होताच मुंबई खाकी वर्दीची गस्त; नेमकं काय घडतंय?

राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात एका इको कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर आता मुंबई पोलीस हायअलर्टवर आहेत.

Delhi Red Fort Blast : सीएसटीला पोलिसांचा वेढा, दिल्लीत स्फोट होताच मुंबई खाकी वर्दीची गस्त; नेमकं काय घडतंय?
delhi red fort blast and mumbai police
| Updated on: Nov 10, 2025 | 9:30 PM

Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात एका व्हॅनमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर दिल्ली हादरली आहे. दिल्लीमध्ये घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपासाची चक्रं फिरवली जात आहेत. हा एक साधारण स्फोट होता की यामागे काही घातपात आहे, याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील सर्व पुरावे पोलीस, फॉरेन्सिक टीकमकडून जमा केले जात आहेत. दिल्लीत घटनास्थळावर बॉम्बनाशक पथक, डॉक स्कॉड दाखल झाले असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. असे असतानाच आता दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

मुंबईत सगळीकडे पोलिसांची गस्त वाढली

मुंबईच्या सीसीएसटी परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलीस सध्या हायअलर्टवर आहेत. या शहरात जिथे-तिथे पोलीस दिसत आहेत. खबरदारी म्हणून सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्तींची झाडाझडती घेतली जात आहे. पोलिसांची पथकंच्या पथकं सर्वत्र फिरताना दिसत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात काही दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम संपूर्ण देशात पडतो. त्यामुळेच आता खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी करत खबरदारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लातील स्फोटानंतर मुंबईसह पुणे शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आले आहे.

दिल्लीत स्फोटात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात हा स्फोट झाला आहे. व्हॅनमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर स्फोटाची आग इतरही गाड्यांना लागली आणि साधारण आठ ते दहा वाहनांना आग लागली. यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. स्फोट झाल्याचे समजताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेच घटनास्थळी अग्निशामक दल, डॉक स्क्वॉड, बॉम्बशोधक पथकही दाखल झाले. संध्याकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी स्फोटाची ही घटना घडली आहे. बॅटरी फुटल्यामुळे हा स्फोट झाला की यामागे काही घातपात होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.