Rohit Pawar vs Manikrao Kokate : ‘नाईलाजाने मला सत्य…’, रोहित पवारांकडून नवीन VIDEO पोस्ट, त्यात माणिकराव कोकाटे…

Rohit Pawar vs Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी त्यांची बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. त्यानंतर आता रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंचे दोन नवीन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. #राजीनामा_द्यावाच_लागेल! असं रोहित पवार यांनी या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar vs Manikrao Kokate  : नाईलाजाने मला सत्य..., रोहित पवारांकडून नवीन VIDEO पोस्ट, त्यात माणिकराव कोकाटे...
Rohit Pawar vs Manikrao Kokate
| Updated on: Jul 22, 2025 | 12:47 PM

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाइन रमी खेळत असल्याचा आरोप झाला. आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात टि्वट करुन आरोप केला होता. माणिकराव कोकाटे यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. “ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे” असा इशाराच माणिकराव कोकाटे यांनी दिला.

त्यावर आता रोहित पवार बोलले आहेत. “सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो?” असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

….तर ही वेळ आली नसती

“विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्देव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती” असं रोहित पवार म्हणाले.


‘मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय’

“विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.