14 मार्चला सरकार कोसळणार? अर्थसंकल्पावर अजित पवार यांचा मोठा दावा, काय म्हणाले अजित पवार…

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत असतांना अजित पवार यांनी सरकारचे भविष्य सांगून टाकले आहे. एकूणच राज्यातील सरकार कधी कोसळणार आहे याचा अंदाज अजित पवार यांनी बांधला आहे.

14 मार्चला सरकार कोसळणार? अर्थसंकल्पावर अजित पवार यांचा मोठा दावा, काय म्हणाले अजित पवार...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 09, 2023 | 4:06 PM

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget ) म्हणजे शब्दांचे फुलोरे आणि चुनावी जुमला असल्याचे म्हणत सडकून टीका केली आहे. मात्र याच काळात 14 मार्चला सरकार कोसळणार असल्याची भीती असल्याने अर्थसंकल्पात निव्वळ घोषणा करण्यात आल्या आहे. आणि विधानपरिषद आणि पोटनिवडणुकीत झालेला परभव पाहता नागरिकांना खुश करण्यासाठी फक्त घोषणा करण्यात आल्याचं विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यामध्ये अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री शब्द बदलून पंचामृत हा शब्द वापरला यावरूनही टीका केली आहे.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत ध्येय सादर करीत अर्थ संकल्प सादर केला आहे. त्यावरून अजित पवार यांनी टीका केली आहे.

शब्दांचे फुलोरे आणि चुनावी जुमला म्हणत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यामध्ये मात्र अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा पाहून सरकार 14 मार्चला कोसळणार असल्याचे म्हंटले असून राज्य कर्जबाजारी पणाकडे जाणार असल्याचे म्हंटले आहे. एकूणच काय तर अजित पवार यांनी सरकार अल्पकाळ रहाणार असल्याचा दावा केला आहे.

खरंतर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचा संदर्भ देऊन 14 मार्चला सरकार कोसळणार असल्याचा अंदाज आल्याने हा अर्थसंकल्प सादर केल्याचे म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालय सुरू असलेल्या सुनावणीवरून अजित पवार यांनी तर्क लावून दिलेली प्रतिक्रिया भुवया उंचावनारी आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात निकाल येणार असल्याचा दावा करत अजित पवार यांनी सरकारचे भविष्यच एक प्रकारे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामध्ये काही दिवस शिल्लक राहिलेले असतांना सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असल्याने लवकरच अजित पवार यांनी केलेला दावा खरा होतो का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तर देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात पुस्तक लिहिले होते, त्यामध्ये त्यांनी अर्थसंकल्प कसा तयार करायचा हे सांगितले होते, मात्र तो कसा वाचायचा हे सांगितले नव्हते ते सांगायला पाहिजे होते असे म्हणत अजित पवार यांनी सडकून टीका देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पावर केली आहे.