
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला गळती लागल्याच चित्र आहे. या तिन्ही पक्षातून राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करताना दिसतात. मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही अन्य पक्षातून बऱ्याच जणांनी प्रवेश केला आहे. पण सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. तिथे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी याची वेळीच दखल घेऊन पावलं उचलावी लागतील. कारण पुढच्या दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी हे चांगले संकेत नाहीयत.
मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिट्ठी दिली. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरु झालय. “संजय कोकाटे आणि पंढरपुरच्या महेश साठे या दोघांमुळे सोलापूर जिल्हातील शिवसेना फुटली. या दोघांच्या कुरघोडीमुळे आम्ही राजीनामे देत आहोत” असं माढा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी सांगितलं.
कुरघोडीतून राजीनामा सत्र
“मागील दोन महिन्यांपासून चुकीच्या लोकांना या दोघांनी पदे वाटल्यामुळे जिल्ह्यात आता ही सेनेची अवस्था झालीय. पक्षाच्या निरीक्षकांसह वरिष्ठांना देखील या मंडळीनी चुकीची माहीती दिल्याच्या कुरघोडीतून राजीनामा सत्र सुरु झालंय” असं मुन्ना साठे म्हणाले. मुन्ना साठे यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी 31 जुलै रोजी आपल्या पदाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.
मागच्या आठ दिवसांपासून राजीनामा सत्र
सावंतांच्या राजीनाम्यामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात धक्का बसला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्हातील शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत. त्यातच आता माढा तालुक्यातील तालुका प्रमुख मुन्ना साठेसह 16 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत.