क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात, 2 जणांचा मृत्यू
अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर क्रूझर गाडीने पाठीमागून एका ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये क्रूझर गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अपघात वार ठरला आहे. आज सकाळीच मुंबईत रेल्वेचा भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये एक क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक झाली आहे. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
आज पहाटे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक भीषण अपघात घडला. अहमदनगर ते संभाजीनगर महामार्गावर क्रूझर गाडीने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडीचे छत अक्षरशः उडून गेले. या अपघातात दोन जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत.
हे सर्वजण जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे विद्यार्थी होते. या गाडीत १३ विद्यार्थी होते. हे सर्वजण महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) चे क्रिकेट सामने पाहण्यासाठी पुणे येथे गेले होते. हे सामने पाहून परत येत असताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला.
या अपघातात ११ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईत रेल्वे अपघात
दरम्यान कसाऱ्याहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोकलच्या दरवाज्याला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले, त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. एकमेकांना त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे ते ट्रेनमधून पडले असावेत, असे म्हटले जात आहे. या घटनेनंतर आता रेल्वे बोर्डाने नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील, असा मोठा निर्णय घेतल्या आहेत. 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत, असे सांगितले आहे.
