
राज्यभर गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली दिसली. मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना याचा फटका बसेलला पाहायला मिळाला. शहरांमध्ये तर लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. शॉक लागून आणि पाण्यात बुडून माणसांसह जनावरांचा मृत्यू झाला. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यामध्ये महिलेन आपली अंगावरील साडीच्या मदतीने दोन सख्ख्या भावांना बुडता-बुडता वाचवलं.
गोदावरी नदीपात्रामधील पाण्यामध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील तीन सख्खे भाऊ आपली मोटार काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले. काही वेळात दुर्देवाने नदीचं पाणी वाढलं आणि पाण्याच्या प्रवाहामुध्ये तिन्ही तरूण वाहून गेले. त्यावेळी तिथे शेळ्या चारण्यासाठी ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार यांनी त्यांना बुडताना पाहिलं.
तीन सख्ख्या भावांना बुडताना पाहून ताराबाई यांनी वेळ न घालवता आपल्या अंगावरील साडी काढली. कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीचा दोर करत तरूणांना मदत केली. त्यावेळी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे यांच्यामधील दोघेजण वाचले. मात्र संतोष तांगतोडे हा खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं. ताराबाई यांनी प्रसंगावधान दाखवत दोन भावांचा जीव वाचवला. ताराबाई यांच्या धाडसाची पंचक्रोषीमध्ये चर्चा असून त्यांचं कौतुक होत आहे. जर त्यांनी वेळीच मदत केली नसती तर तांगतोडे घरातील तिन्ही तरूण एकाचवेळी बुडाले असते.
दरम्यान, बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि जिगरबाज तरुणांनी अथक मेहनत घेतली.