
AIMIM Mumbra Sahar Sheikh Latest Statement: महानगरपालिकेच्या निवडणूकीत सहर शेख यांचा मुंब्रा येथून विजय झाला. पण त्यांच्या एका वक्तव्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झालं. निवडूण आल्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवणार… असं वक्तव्य सहर शेख यांनी केलं होतं. असं वक्तव्य करणाऱ्या सहर यांनी पुन्हा पलटी मारली आहे. ‘देशात आपल्या मुस्लिमांचं रक्त देखील सामावलं आहे. हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही… माझ्या आधीच्या विधानाचा निषेध करत अनेक लोक पाकिस्तानात जाण्याबद्दल बोलत आहेत. पण आम्ही भारतीय मुस्लिम आहोत आणि हा आमचा देश आहे. आम्हाला कोणीही कुठेही जायला सांगू शकत नाही…’ असं देखील सहर शेख म्हणाल्या.
सहर शेख पुढे म्हणाल्या, ‘माझ्या पहिल्या विधानाची क्लिप कट करुन वाईट प्रकारे दाखवण्यात आली… माध्यमांनी माझं पूर्ण विधान दाखवलं नाही… ही गोष्ट मुंब्रा येथील प्रत्येकाच्या लक्षात आली आहे… अनेकांनी मझं समर्थन देखील केलं आहे…’ एवढंच नाही तर, सहर यांनी आरोप केले की, माझ्या भाषणातील काही भाग व्हायरल करून त्यांना मुंब्र्याच्या लोकांना भडकवायचं होतं. पण तसं काहीही घडलं नाही. येथील लोक समजदार आहेत. मुंब्र्यातील हिंदू आणि मुस्लिम एकत्र सौहार्दाने राहतात. ते भडकावणाऱ्यांच्या चिथावणीला बळी पडले नाहीत.
राहत इंदोरी यांचं शेर वाचून सहर शेख म्हणाल्या, ‘या मातीमध्ये मुसलमांनाचं देखील रक्त आहे. हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही…’ सांगायचं झालं तर, सहर शेख आधी एनसीपी (शरद पवार गट) पक्षात होत्या. पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सहर ओवेसी यांच्या पक्षात सामील झाल्या. निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख यांनी ‘आम्ही संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू’ असे आक्षेपार्ह भाषण दिलं होतं.
मुंब्र्यातील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना मुंब्रा पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होतं. चिथावणीखोर वक्तव्य करु नये ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल तसेच स्टेटमेंट सार्वजनिक आणि सोशल मीडियावर देखील करू नका असं म्हणत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली आहे.