
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातलं वातावरण प्रचंड तापलेलं असून याप्रकरणी सरकारला चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरणही गरम असून या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केला हे. यामुळेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीदेखील सातत्याने मागणी केली जात आहे. मुंडे यांनी याविषयी आक्रमक बाजू मांडली, मात्र कालच ते राधानी दिल्लीत गेले होते. त्यांच्या खात्याच्या कामासाठी त्यांची दिल्लीवारी झाली असली तरी त्यावरून विविध चर्चांना उधाण आलं होतं. पद वाचवण्यासाठी मुंडे हे दिल्लीत गेल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. ाता याच सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे.
अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार इथे आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी , पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी त्यांना कानमंत्र तर दिलाच पण त्यांचे कानही टोचले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावरूनही टिप्पणी केली. आम्ही इथे कामासाठी आलोय. धनंजय मुंडेंची दोन दिवसांची दिल्लीत महत्वाची मीटिंग होती, पण त्यावरून काहीही बातम्या चालत होत्या. वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. अन्न-नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथे असल्या की (धनंजय मुंडेंना) जावं लागतं. मुख्यमंत्री असोत किंवा एकनाथ शिंदे किंवा मी, आम्हालाही तिथे जावं लगातं. जर फायनान्सची मीटिंग असेल तर मला जावं लागतं, होमची मीटिंग असेल तर गृहमत्र्यांना जावं लागतं, नगरविकासची मीटिंग असेल तर एकनाथ शिंदेंना जावं लागतं. वास्तविक आजही तिथे त्याच्या ( धनंजय मुंडे) महत्वाच्या मीटिंग होत्या, कारण दिल्लीतून जास्तीत जास्त पैसा आपल्या राज्याला कसा मिळेल, हे पहावं लागतं. दिल्लीत बैठकीसाठी जावं लागतं, निधि महत्वाचा असतो, असं सांगत अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीवरून झालेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
बीडच्या परिसरातील अनेक बातम्या आपण वाचत आहोत. जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई केली जाई. पण जिथे तथ्य नसेल तिथे कारवाईचा प्रश्न येत नाही असंही अजित पवार म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं आहे.या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. अखेर महायुती सरकारने ही मागणी मान्य करत अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवले असून आज त्यांचा पहिलाच बीड दौरा आहे.