बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, पालकमंत्री अजित पवारांचा तरुणांसाठी मोठा निर्णय

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारांमुळे चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजीच्या १९१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, पालकमंत्री अजित पवारांचा तरुणांसाठी मोठा निर्णय
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 16, 2025 | 8:52 PM

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांमुळे चर्चेत आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बीडमध्ये हत्या, खून, अत्याचार, आत्महत्या अशा अनेक घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला एक आनंदाची बातमी दिली आहे. बीडमध्ये लवकरच तरुणांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

अजित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..! असे म्हटले आहे. बीडमध्ये लवकरच तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनी जिल्ह्यात तब्बल १९१ कोटी रुपये खर्चून एक नवीन प्रशिक्षण केंद्र (सीआयआयआयटी) उभारण्यात येणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापनेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं जात आहे. बीडचा पालकमंत्री या नात्यानं मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन सीआयआयआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन सेंटरमधून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यातून बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, ही अत्यंत समाधानाची बाब आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिक चिंतेत होते. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरुणांना नवी उमेद देणारी बातमी दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळेल. त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टाटा टेक्नॉलॉजीसारख्या प्रतिष्ठित कंपनीने बीडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.