
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. सकाळी 9 च्या सुमारात बारामती विमानतळाजवळ विमान कोसळल्याने अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अजित दादांच्या निधनाची बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या घटनेनंतर अजितदादांची काटेवाडी सुन्न झाली आहे.
अजित पवारांच्या बंगल्यावर आलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाताने कधीच परतला नाही. मात्र सध्या त्यांच्या काटेवाडी येथील पवार बंगला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवासस्थानाबाहेर देखील शोकाकुल वातावरण आहे .अजित पवार आपल्याला परत भेटतील या आशेने आजही अनेकजण येत आहेत. उद्या अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी 6 ते 9 पर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. काटेवाडी गावावर अजित पवार यांचं विशेष प्रेम होतं. याच काटेवाडी गावात अजित दादा ज्यांच्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झाले ते जेष्ठ मंडळी अक्षरशः सैरभर झाले आहेत. अनेकांना अश्रु अनावर झाल्याचे पहायला मिळाले. अजित पवार आपल्यात नाहीत यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. या गावातील प्रत्येकजण सध्या शोकसागरात बुडालेला आहे.
गुरुवारी सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. यानंतर सकाळी 11 च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी राज्यातील सर्वच बडे नेते हजर राहणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अनेक बडे नेते उद्या बारामतीत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहणार आहेत.