
दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. हा फक्त पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का नाहीय. अख्ख्या महाराष्ट्राला अजितदादांच्या अचानक निघून जाण्याने दु:ख झालय. कोणी ध्यानीमनी विचार केला नव्हता अशी ही भयानक घटना आहे. नियतीने महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला हिरावून नेलं. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पश्चात राजकीय वारसा कोण पुढे नेणार, याची चर्चा आता सुरु झालीय. या बद्दल वेगवेगळी मत व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी होत आहे. दरम्यान शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वप्रथम शशिकांत शिंदे यांनी अजित दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं राहिलं म्हणून खंत व्यक्त केली. “मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठका सुरू होत्या. या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय अजितदादांनी घ्यायचं ठरवलं होतं.यासाठीच या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी बहुतांश जागेवर एकत्र लढताना पाहायला मिळत आहेत” असं शशिकांत शिंदे म्हणाले.
पवार कुटुंबाने एकत्र बसून निर्णय घ्यावेत
“जे काही निर्णय घ्यायचे आहेत. त्याविषयी पवार कुटुंबाने एकत्र बसून निर्णय घ्यावेत. सातारा जिल्ह्यात जो विकास झाला त्यामध्ये अजित दादांचा मोठा सहभाग होता” असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री पदाबाबत एकत्र पवार परिवार निर्णय घेईल
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच दुसरे वरिष्ठ नेते राजेश टोपे म्हणाले की, “अजित दादांच्या दु:खद घटनेतून कोणीही सावरलेलं नाही.दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्न पूर्वीसुद्धा झालेले आहेत” “पवार साहेब, सुनेत्रा वहिनी, तटकरे साहेब यांनी याबाबत निर्णय घ्यावा ही आमच्यासारख्यांची भावना आहे. दादा हयात असताना आमच्या ज्या बैठका झाल्या. त्यात त्यांची इच्छा होती की एकत्र यावं. त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्याचदा आम्हाला बोलवून दाखवलं. एकत्र येणे दोन्ही पक्षाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे” असं राजेश टोपे म्हणाले.
“Ncp अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल. महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा आमची यापूर्वीच चर्चा झाली असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना घड्याळावर लढण्याची परवानगी दिली होती.उपमुख्यमंत्री पदाबाबत एकत्र पवार परिवार निर्णय घेईल आणि तो त्यांनी घ्यावा.जो काही निर्णय असेल त्याचं मी स्वागतच करेन” असं राजेश टोपे म्हणाले.