
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील धाडसी नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामती येथे विमान लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. प्रशासनावर आणि जनतेवर प्रभाव असलेला एक करिष्माई लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. आता अजित पवार यांच्या निधनाच्या काही तास आधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धावपट्टीजवळच विमानात स्फोट
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून चार्टर विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या रनवेवर लँडिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले, धडकले आणि लगेचच पेट घेत मोठा स्फोट झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) केली आहे.
पवार कुटुंब बारामतीत दाखल
अपघाताची बातमी समजताच पवार कुटुंबीय हादरून गेले. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबातील जवळचे सर्व सदस्य तातडीने बारामतीत पोहोचले आहेत. अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील अहिल्याबाई होळकर रुग्णालयात आणण्यात आले असून, रुग्णालयाबाहेर हजारो कार्यकर्ते जमले आहेत. “अजितदादा परत या”, “दादा जिंदा आहे” अशा भावुक घोषणा देत ते शोक व्यक्त करत आहेत.
Ajit Pawar Last photo
सोशल मीडियावर ‘शेवटचा फोटो’ व्हायरल
विमानात बसलेल्या अजित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पांढरा झब्बा-पायजमा, गुलाबी जॅकेट, डोळ्यांवर सनग्लासेस आणि नेहमीच्या ठसकेदार स्टाइलमध्ये ते दिसत आहेत. तसेच त्यांचा प्रसन्न चेहरा दिसत आहे. त्यांच्या शेजारी सुरक्षा रक्षकही दिसत आहे. हा त्यांचा ‘शेवटचा फोटो’ असल्याचे म्हटले जात असले तरी हा फोटो आज सकाळीचा आहे की पूर्वीचा, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
नेमकं काय घडलं?
बारामतीत झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पूर्ण राजकीय सन्मानाने पार पडणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) यांनी दिली आहे.