तू केस वाढवल्याने मी मुख्यमंत्री होणार…अजितदादांच्या खंद्या कार्यकर्त्याने अखेर घेतला मोठा निर्णय Video viral

अजितदादांना कार्यकर्त्यांच्या गोतावळा प्रिय होता. उपमुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्र्यांच्या दालनात जशी गर्दी होते, तशी अजितदादांच्या दालनात होत असे. दादांकडे काम नेले म्हणजे ते होणारच अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना होती. त्यांच्या कामाचा माणूस सोडून निघून गेल्याने कार्यकर्त्यांना हा धक्का पचवणे कठीण बनले आहे.

तू केस वाढवल्याने मी मुख्यमंत्री होणार...अजितदादांच्या खंद्या कार्यकर्त्याने अखेर घेतला मोठा निर्णय Video viral
Late ajitdada pawar and vilas zodape ( file photos )
| Updated on: Jan 30, 2026 | 5:08 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने राज्यात दुखवटा पाळला जात आहे. काल अजितदादा यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे भविष्यात होणार मुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल सुरु होती. परंतू त्यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कोण करणार हा सवाल केला जात आहे. राज्यातील उमदे नेतृत्व काळाने हिरावल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तर भावनांचा कडेलोट झाला आहे. आपला लाडका नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी अजितदादांच्या कार्यकर्त्याने केस न कापण्याची शपथ घेतली होती. अजित पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या विलास झोडापे यांनी अखेर जो निर्णय घेतला तो पाहून सर्वसामान्याचे मन हेलावले आहे.

अजितदादा पवार यांच्या अनाकलनीय विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी अशी दोन्हीकडच्या मातीशी नाळ असलेला अजितदादांसारखा नेता तसा दुर्मिळच. अजितदादांना कार्यकर्त्यांच्या प्रेमाची पुरेपूर जाणीव होती.कार्यकर्त्यांच्या लेखी देखील अजितदादांचा शब्द म्हणजे दगडावरची पांढरी रेघ.अशाच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील दादांचा चाहता विलास झोडपे यांनी दादांना वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे. विलास झोडपे यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून डोक्याचे केस कापणार नाही अशी शपथच 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतली होती.

त्यावेळी अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्याचे प्रेम पाहून त्याला कानपिचक्याही दिल्या होत्या. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी भाषण मिश्कील शब्दात कार्यकर्त्याला प्रेमाने समजावले होते. “विलास तू डोक्यावरचे केस वाढविल्याने मी मुख्यमंत्री होणार नाही, लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं, तुझ्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले पाहिजेत, केस वाढविल्याने तू बाई आहेस की माणूस तेही कळणार नाही, तेलाचा खर्च वाढेल.त्यापेक्षा लोकांची काम करा, पक्ष संघटना मोठी करा” असा सल्ला यावेळी विलास झोडापे यांना अजितदादांनी दिला होता.

येथे पाहा व्हिडीओ –

अजितदादांना भेटण्यासाठी 28 तारखेला विलास झोडपे सकाळी मुंबईत पोहचले होते. मात्र, थोड्याच वेळात अजित दादांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यानंतर विलास यांनी मुंबईहून थेट बारामती गाठले. पत्नी आणि दोन
मुलांनाही नागपूरहून बारामतीला बोलावून दादांच्या अंत्यसंस्कार वेळी विलास झोपडे सहकुटुंब उपस्थित राहिले. आता दादा नाहीत,त्यामुळे त्यांच्यासाठी वाढवलेले केस, त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून दादांच्या अंतिम संस्कारनंतर नीरा नदीच्या संगमावर मुंडन करून विलास झोडापे यांनी अर्पण केले आहेत.