…तर विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल; अजित पवार गटाच्या नेत्यांचं मोठं विधान

Amol Mitkari on Vidhansabha Election 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. जागावाटपात समाधानकारक जागा मिळल्या नाहीत तर स्वतंत्र लढावं लागेल, असं अमोल मिटकरी म्हणालेत. त्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया काय? वाचा सविस्तर...

...तर विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल; अजित पवार गटाच्या नेत्यांचं मोठं विधान
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 26, 2024 | 1:14 PM

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सध्या राज्यात चर्चेत आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष त्या- त्या युतीमध्ये निवडणुकी लढणार की स्वतंत्र निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने विधानसभा निवडणूक आणि युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावरच लढावं लागेल. तर विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल, असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरी यांचं विधान काय?

मला असं वाटतं की राष्ट्रवादीने केवळ 100 जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील. तर त्यात आम्ही समाधानी असू असं नाही. महायुती आणि मविआ म्हणतात आम्ही 100 100 जागा लढू 288 मतदारसंघ आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणालेत.

महायुतीमध्ये राष्ट़्रवादीच्या प्रवक्त्याला आवर घालावं, असं वाटत असेल तर मग शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भाजपाचे प्रविण दरेकर असतील यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाने घालावा. चंद्रकांत पाटील आणि माझा फोनवर संवाद झाला. काल त्यांनी वक्तव्य केलं असता मी त्यांना उत्तर मागितलं की तुमच्या वेळी छुपा राजाश्रय होता का? मग त्यांनी मला फोनवर सविस्तर सांगितलं आणि महायुतीमध्ये विसंवाद नको. आपण तिन्ही एकत्र असावा, असं सांगितल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत.

शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया

महायुतीमध्ये मिटकरींनी बोलताना पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे महायुतीच्या तिन्हीपक्षाच्या नेत्यांचा सूर आहे. अमोल मिटकरी यांनी जागा वाटपाबाबत केलेल्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपाची चर्चा ही माध्यमांसमोर करायची नसते. तिन्ही पक्षांचे प्रमुख आणि रामदास आठवले, महादेव जानकर बसून ठरवतील. अशी वक्तव्य करुन विनाकारण महायुती मध्ये गैरसमज निर्माण होतात. गैरसमज निर्माण होइल असं वक्तव्य कोणी करु नयेत. महायुतीतील अधिकार ज्यांना दिलाय त्यांना ठरवू किती जागा कोणाला द्यायच्या. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हे एकनाथ शिंदेंकडे दिलेले आहेत. तसंच भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये देखील आहे, असं देसाई म्हणाले.