
अकोला शहरात एका माथेफिरूने क्रूरतेचा कळस गाठला आहे. कुत्रे सातत्याने भुंकतात, या कारणामुळे एका माथेफिरुने त्यांना विषारी औषध देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. यात तब्बल २५ हून अधिक कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्राणी प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मृत श्वानांमध्ये मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहराला लागून असलेल्या गुडधी भागात ही धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जात असताना मोकाट कुत्रे आपल्या अंगावर भुंकतात. या क्षुल्लक कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिले. विषारी अन्न खाल्ल्याने २४ तासांच्या आत तब्बल २५ हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला, तर काही कुत्र्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
उमरी प्रभागातील रहिवासी संदीप गावंडे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही अत्यंत निंदनीय घटना आहे. मुक्या प्राण्यांना अशा प्रकारे मारणे हे क्रूरतेचे लक्षण आहे. प्रशासनाने या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी.” अशी मागणी संदीप गावंडे यांनी केली आहे. या घटनेमुळे अकोला शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मारेकऱ्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. पोलीस आता या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.