खारं पाणी ठरतंय अकोल्यातील गावकऱ्यांच्या किडनीसाठी काळ; नेमका प्रकार काय?

बाळापूर तालुक्यातील सावरपाटी आणि आसपासच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात असलेल्या जास्त प्रमाणात क्षारामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले आहेत. काही जणांच्या किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. दूषित पाणी पिण्यामुळे झालेला हा आरोग्य संकट गंभीर असून, नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

खारं पाणी ठरतंय अकोल्यातील गावकऱ्यांच्या किडनीसाठी काळ; नेमका प्रकार काय?
akola water issue
| Updated on: Mar 31, 2025 | 2:34 PM

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एक गंभीर समस्या समोर आली आहे. बाळापूर तालुक्यातील सावरपाटी आणि परिसरातील २० ते २५ पेक्षा अधिक गावांमध्ये खारं पाणी प्यायल्याने अनेक नागरिकांना किडनीचे गंभीर आजार जडले आहेत. इतकेच नव्हे, तर अनेकांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी पिण्याच्या गोड पाण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. अनेक कुटुंबांना गोड पाण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे.

बाळापूर मतदारसंघातील सावरपाटी गावात विहिरी आणि बोअरवेलमधील क्षारयुक्त पाणी नागरिक पिण्यास वापरत आहेत. याच कारणामुळे गावकऱ्यांना किडनी स्टोन आणि किडनीसंबंधी विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सावरपाटी गावात तीन ते चार जणांना या दूषित पाण्यामुळे किडनीचे आजार झाले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, एका व्यक्तीला तर आपली किडनी गमावावी लागली आहे.

कोणतीही ठोस उपाययोजना नाही

प्रशांत काळे हे सावरपाटी येथील रहिवासी आहेत. प्रशांत यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. त्यांच्या उपचारासाठी तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक खर्च आला आहे. या उपचारासाठी त्यांनी आपली शेती विकली. मात्र तरीही त्यांना पुरेसा निधी जमवता आलेला नाही. गावातील अनेक नागरिकांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. याप्रकरणी गावकऱ्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून या समस्येकडे लक्ष वेधले जात असले, तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

नागरिकांचे आरोग्य अधिक धोक्यात येण्याची शक्यता

या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “मी या प्रकरणाची माहिती घेतो आणि तपासणी करतो. त्यानंतरच यावर अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकेन.” मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये अधिक नाराजी पसरली आहे. एकंदरीत, बाळापूर तालुक्यातील सावरपाटी आणि परिसरातील गावांमधील खारं पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांना पिण्याच्या गोड पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा, या भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.