
संपूर्ण राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत महायुती सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तसेच महायुतीनेच सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. या तुलनेत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अत्यंत पुअर राहिला आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसला या निवडणुकीत घवघवीत यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काँग्रेसची पाळंमुळं अजूनही खोलवर असल्याचं दिसत आहे. राज्यात सर्वत्र भाजपचा दबदबा राहिलेला असतानाच अलिबागमध्ये मात्र, भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र दिसत आहे. अलिबागकरांनी भाजप, शिंदे गट, अजितदादा गटाला सपशेल नाकारलेलं दिसत आहे. या ठिकाणी अलिबागकरांनी शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेकापला भरभरून यश दिल्याचं चित्र आहे.
अलिबागमध्ये मोठी लढत होती. या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. तसेच राज्यात सर्वच निवडणुकीत भाजपचा बोलबाला राहिला आहे. त्यामुळे अलिबागमधील शेकापच्या वर्चस्वाला भाजप धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शेकापच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपने प्रचंड मेहनतही घेतली. पण मतदारांनी पारंपारिक आणि स्थानिक पक्षालाचा प्राधान्या देण्याचं ठरवल्याचं दिसत आहे.
नगराध्यक्षही शेकापचाच ?
अलिबागमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये शेकापला 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर ठाकरे गटाने दोन आणि भाजपने एका जागेवर आघाडी घेतली आहे. अजितदादा गट, शिंदे गट आणि शरद पवार गटाला अलिबागमध्ये खातंही खोलता आलेलं नाही. तर शेकाप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक या 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अलिबागमध्ये शेकापचाच नगराध्यक्ष होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
उरणमध्ये काय घडतंय ?
दरम्यान, उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार भावना घाणेकर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे पवार गटासाठी ही मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे. रायगड जिल्ह्यातही अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी रायगडचा किल्ला एक हाती राखला आहे. रायगडवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता शिंदे गटाकडून रायगडच्या पालकमंत्रीपदावर पुन्हा एकदा दावा केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.