
“सातारा ड्रग्स प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणात जे नाव येत आहे, त्याचे धागेद्वारे उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत आहे. कारण तिथला रिझल्ट, तिथे काम करणारे लोक या प्रकरणात ज्यांनी या लोकांना काम करायला बोलावलं त्यांना नाही तर, तिथल्या लोकांना अटक करत आहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांची ही जबाबदारी होती. मात्र मुंबई पोलिसांनी इथे कारवाई केली आहे, याचा अर्थ सातारा पोलिसांचा यात सपोर्ट होता” असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. “आमदार, खासदारांना मुंबईत घर असावं या हा उद्देश याचा आहे. काही आमदार खरंच गरीब आहेत. सगळेच गरीब आहेत, असं मी म्हणणार नाही. मात्र काही आमदार खरंच गरीब आहेत. त्यांना मिळालं तर यात वावगं असण्याचे कारण नाही” असं अंबादास दानवे म्हणाले.
“आम्हाला अनेक उमेदवारांचे फोन येत आहेत. आम्हाला भाजप, सेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर आम्हाला उमेदवारी मिळेल का? अशी विचारणा केली जात आहे. त्या लोकांना आम्ही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र असे फोन आम्हाला सुरू आहेत एवढेच मी तुम्हाला सांगतो” असं अंबादास दानवे म्हणाले. “वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचाच माणूस आहे. नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण झाली. वाल्मिक कराड सुटला तर हत्तीवरून साखर वाटण्याची तयारी मुंडे यांच्या बगलबच्चानी केली होती. धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड असो वाल्मिक कराडचा या प्रकरणात थेट संबंध आहे. वाल्मिक कराडचा जामीन झाला नाही ते चांगलं झालं” असं अंबादास दानवे म्हणाले.
आपली आघाडी व्हावी असं आमच मत
“अजित दादांच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने जाणं म्हणजे, अजित पवार हे भाजपला मदत करत आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मग काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो आणि आमची शिवसेना अशा पद्धतीने आपली आघाडी व्हावी असं आमच मत आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीवर ते म्हणाले की, ‘मी जे बोललो त्याचाच तो भाग असू शकतो सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवली पाहिजे’