साहेब तोंड दाखवायला जागा राहिली नाही, लोक शिव्या घालताये हो…, भाजपच्या बड्या नेत्याला कार्यकर्त्याचा फोन, ऑडिओ क्लीप व्हायरल
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीमधून वगळण्यात आल्याने या कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

पावसाभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकं वाळून गेली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा घोषणा केली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. परंतु काही तालुके यामधून वगळण्यात आले आहेत. जे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत, तिथे आता नाराजी पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीमधून वगळण्यात आल्याने या कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या ऑडिओ क्लीपची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्ठी करत नाही.
मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीतून का वगळला? लोकं आता आम्हाला शिव्या घालत आहेत, तालुका कशामुळे वगळला? याचं कारण तर लोकाला आता आम्हाला द्यावं लागेलना, असा जाब विचारणारा फोनच थेट एका कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे. या फोनची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. यावर बोलताना 24 तास ही झाले नाहीत, तर उगाच बोंबाबोंब करत राहता, शासनाने काही केलच नाही का? शांत राहा दोन दिवस, शिव्या खा असा सल्ला यावर अशोक चव्हाण यांनी संबंधित कथित ऑडिओ क्लिपमधून आपल्या कार्यकर्त्याला दिल्याचं दिसून येत आहे. ही कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. परंतु हा कार्यकर्ता नेमका कोण आहे? हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये, सदर ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे.
ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
कार्यकर्ता- साहेब रामराम वो,
बोलाना, काळजी करू नका मुदखेड तालुका दुष्काळात शंभर टक्के राहिलं
कार्यकर्ता – काय काळजी करू नका सर , आम्ही जुने कार्यकर्ते. आता आम्हाला तोंड काढायला जागा नाही कुठं , लोक शिव्या देतात आम्हाला, साहेब आपला तालुका कशामुळे वगळला?
अरे थांबा ना थोडं, येवढी घाई कसली लागली, विश्वास तर ठेवा ना थोडा.
कार्यकर्ता – तसं नसतं साहेब,कारण तर सांगावं लागलं ना लोकांना. आहो अख्ख्या महाराष्ट्रातले एवढे तालुके घेतले, आपल्याच जिल्ह्यातले दोन तालुके कशामुळे वगळले?
अरे विश्वास तर ठेवा, तुम्हाला काय म्हणायची गरज नाही 24 तास ही झाले नाहीत, उगाच बोंबाबोंब करीत राहतात, शासनाने काही केलच नाही का?
कार्यकर्ता – अहो साहेब तुम्हाला कळते तेवढं आम्हाला कळत नाही, पण तालुका वगळण्याचं नेमकं कारण काय?
थांबा जरास, शांत राहा, दोन दिवस शिव्या खा, हरकत नाही