नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट ‘प्रहार’; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे

| Updated on: Feb 07, 2021 | 4:28 PM

भाजप खासदार नारायण राणे यांच्या छबीचं लोक अनेकप्रकारे वर्णन करतात. मात्र, माझ्या मते, नारायण राणे जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. | Amit Shah

नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट प्रहार; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे
भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी कोकणात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली.
Follow us on

कणकवली: भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी कोकणात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपमध्ये त्रास होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान होईल, असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळातील महाविकासआघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच भाजपने युतीधर्म पाळला, कोणतेही वचन मोडले नाही, उद्धव ठाकरे हेच ढळढळीत खोटं बोलत असल्याची टीका अमित शाह यांनी केली. (Amit Shah slams Shivsena cheif Uddhav Thackeray)

या कार्यक्रमात नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यामुळे आता या सगळ्यावर महाविकासआघाडीचे नेतेही आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्या भाषणातील पाच ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

‘शिवसेनेने बाळासाहेबांच्या सिद्धांतांना तिलांजली दिली’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळसााहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आल्याची टीका अमित शाह यांनी केली.

‘भाजपमध्ये नारायण राणेंवर अन्याय होणार नाही, त्यांचा सन्मान होईल’

भाजप खासदार नारायण राणे यांच्या छबीचं लोक अनेकप्रकारे वर्णन करतात. मात्र, माझ्या मते, नारायण राणे जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेसाठी लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली.

मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि त्यांचा सन्मान कसा करायचा, हे भाजपला ठाऊक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

‘मी बंद खोलीत काहीच करत नाही, जे करायचं ते सगळ्यांसमोर करतो’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा अमित शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘निसर्ग चक्रीवादळावेळी मुख्यमंत्री कोकणात फिरकलेही नाहीत’

कोकणात निसर्ग वादळ आलं. मुख्यमंत्री या भागात किती वेळा आले. एकदाही नाही. पण देवेंद्र फडणवीस तीन वेळा आले. त्यांच्याकडून मी वादळाची माहिती घेत होतो. त्यांनी काजूच्या बागांनाही भेटी दिल्या. आमची जनतेशी बांधिलकी आहे.

पण या सरकारची ती राहिली नाही. हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 75 टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यात तीन पक्षाची आघाडी असूनही हा कौल मिळाला आहे. त्यावरून जनता कुणाच्या पाठी आहे हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.

 

तीन पायांची ऑटो रिक्षा

महाराष्ट्रातील नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करण्यात आला. एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन झालं. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. पण महाराष्ट्रात ऑटोरिक्षाचं सरकार आले, अशी टीका अमित शाह यांनी केली.

 

संबंधित बातम्या:

राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही : अमित शहा

अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं; राणेंची जोरदार बॅटिंग

(Amit Shah slams Shivsena cheif Uddhav Thackeray)