आगीच्या ज्वाळा, हात भाजले… बाळांना वाचवण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता नर्स आत शिरल्या, नेमकं काय घडलं?

Amravati Fire: अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागली. आग लागली तेव्हा या कक्षात 12 बाळं होती. या आगीत तीन लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला तर एनआयसीसूमध्ये कार्यरत असलेल्या पारिचालकांना सहा बालकांना वाचवण्यात यश मिळाले.

आगीच्या ज्वाळा, हात भाजले... बाळांना वाचवण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता नर्स आत शिरल्या, नेमकं काय घडलं?
Amravati Fire
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 24, 2026 | 9:21 AM

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे भीषण आग लागली. व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट होऊन पेटलेल्या या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या सहा बाळांपैकी काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

आगीची सुरुवात नवजात शिशु कक्षात ठेवलेल्या व्हेंटिलेटरच्या स्फोटाने झाली. आग अत्यंत वेगाने पसरली आणि संपूर्ण कक्षा धुराने भरून गेला. अशा भीषण परिस्थितीत ड्युटीवर असलेल्या दोन परिचारिकांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली आहे. आमच्यासमोर फक्त लहान बाळं होती. आग खूपच भयंकर होती, पण आम्ही स्वतःचा काहीही विचार केला नाही. पेटीत ठेवलेल्या बाळांना आम्ही बाहेर काढले. मात्र धूर इतका दाट होता की काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तीन बाळांना वाचवता आले नाही. बाळांना बाहेर काढताना आमचे हात भाजले अशी माहिती त्यांनी दिली.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. प्रत्येकी १३ बाळांची क्षमता असलेल्या या कक्षांमध्ये एकूण ३९ नवजात बालकांवर उपचार होऊ शकतात. आग लागलेल्या कक्षात त्यावेळी १२ बाळे होती. डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत बाळांना बाहेर काढले, तरीही तीन बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

आगीत मृत्युमुखी पडलेल्या तीन नवजात शिशुंची ओळख आता समोर आली आहे.

१) पूजा बोरगे यांचा मुलगा (रा. पुलगाव, वर्धा)

२) गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा (रा. मुरखेड, ता. अंजनगाव सुरजी)

३) किरण बेठेकर यांची मुलगी (रा. बोराळा, ता. चिखलदरा)

ही आग इतकी तीव्र होती की, कक्षातील एसी आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. उल्लेखनीय म्हणजे, स्त्री जिल्हा रुग्णालयाची ही नवीन इमारत बांधून अवघे एक वर्षच झाले आहे. तरीही आग लागल्यानंतर अग्निरोधक यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us