Anil Desai: अपात्रतेचा निर्णय वेळेत घेतला असता तर… अनिल देसाईंचा विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगावर निशाणा
Anil Desai Questions Speaker Verdict in Shiv Sena Disqualification Case: अनिल देसाईंनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. अपात्रतेच्या निर्णयावरून नवा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर खासदार अनिल देसाई यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी उपलब्ध पुरावे आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्णय देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात सत्य वेगळे असतानाही निर्णय वेगळा देण्यात आल्याचा आरोप देसाई यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने दिलेला निर्णयही चुकीचा असल्याचे सिद्ध होत असल्याचा दावा त्यांनी केला.
विधानसभेची मुदत संपल्यामुळे या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार उरलेला नाही, अशी भूमिका शिंदे गटाकडून मांडण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. मात्र, यासाठी त्यांनी 1992 मधील हरियाणाच्या एका प्रकरणाचा दाखला दिला. संबंधित प्रकरणात विधानसभेची मुदत संपल्यानंतरही आमदारांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे विधानसभा विसर्जित झाली किंवा कार्यकाळ संपला, तरी अपात्रतेच्या निर्णयाचे महत्त्व संपत नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाचा निवडणूक आयोगाच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेतील मतभेदांचा मुद्दाही देसाई यांनी खोडून काढला. पक्षांतर्गत मतभेद असतील, तर ते पक्षाध्यक्षांकडे मांडता येतात, त्यांना पत्र देता येते किंवा बैठक बोलावण्याची मागणी करता येते. मात्र थेट आम्हीच पक्ष आहोत आणि आमचेच नेते मुख्य आहेत, अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर व्हीप बदलण्यात आला आणि पक्षावर ताबा मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
देसाई यांच्या मते, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वेळेत घेणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, 2023 मध्येच निर्णय होणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्षांनी 2024 मध्ये निकाल दिला. त्यानंतर निवडणूक आयोगानेही निर्णय घेण्यास विलंब केला. अपात्रतेसंदर्भातील पुरावे समोर असतानाही त्यावर वेळीच निर्णय झाला नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदवला. आज ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादावरही अनिल देसाई यांनी भाष्य केले.
22 जूनच्या बैठकीसंदर्भात सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद वेगळ्या पद्धतीचा होता, असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण प्रकरणाची मांडणी पक्षपाती पद्धतीने केली आणि त्यांचा निर्णय चुकीचा कसा होता, हे आजच्या युक्तिवादातून स्पष्ट झाल्याचा दावा देसाई यांनी केला. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्रतेचा निर्णय घेताना संबंधित आमदारांनी पक्षांतर केले, त्या वेळची परिस्थिती आणि कायदेशीर बाबी तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज आमच्या बाजूने चांगला युक्तिवाद झाला आहे. या प्रकरणात मतभेदांचा प्रश्न नव्हता; पक्षांतर्गत चर्चा करून ते मतभेद सोडवता आले असते, असे देसाई म्हणाले. निवडणूक आयोगाने आपला निर्णय देऊन जबाबदारीतून मोकळे होण्याऐवजी अपात्रतेच्या निर्णयाची वाट पाहणे आवश्यक होते, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता आणि त्याचा परिणाम पुढील घडामोडींवर झाला, असा आरोप करत देसाई यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता सर्वोच्च न्यायालय या युक्तिवादांवर काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
