महाराष्ट्रात उन्हाचा कहर, 24 तासांत 13 जणांचा गूढ मृत्यू, नेमकं काय घडलं?

अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात उन्हाचा हाहाकार पाहायला मिळत असून गेल्या २४ तासांत अमरावतीत ७ तर जळगावात ४ जणांचा उष्माघाताने आणि तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात उन्हाचा कहर, 24 तासांत 13 जणांचा गूढ मृत्यू, नेमकं काय घडलं?
Heatwave
| Updated on: May 26, 2026 | 10:20 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच विदर्भासह खान्देशात सध्या उन्हाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. यामुळे अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अमरावतीत गेल्या २४ तासांत शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही एका सेंट्रिंग कामगारासह एकूण ४ जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे.

अमरावतीत बेघर आणि बेवारस व्यक्तींना उन्हाचा मोठा फटका

अमरावतीत गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील २ जणांचा मृत्यू अधिकृतरीत्या उष्माघाताने (Heatstroke) झाल्याची नोंद आहे. तर उर्वरित ५ जणांचा मृत्यू तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या वाढत्या उन्हाचे बळी प्रामुख्याने रस्त्यावर राहणारे बेघर आणि बेवारस व्यक्ती ठरत असल्याचे समोर येत आहे.

मे महिन्याच्या उत्तरार्धात अमरावतीचा पारा सातत्याने ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अमरावती आणि अकोला परिसराला रेड अलर्ट जारी केला आहे. अमरावती शहरातील ओल्ड कॉटन मार्केट परिसर व इतर भागात अनेक बेवारस आणि वृद्ध व्यक्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. तीव्र उन्हात सावली न मिळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) येथे पाठवण्यात आले आहेत.

जळगावात कामगारासह ४ जणांचा मृत्यू

तर जळगाव जिल्ह्यातही गेल्या महिन्याभरापासून तापमानाचा पारा चाळीशी पार असून वातावरणातील तीव्र उष्णतेचा मोठा परिणाम नागरिकांवर होत आहे. या जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगावातील चिंचोली येथील ५७ वर्षीय सेंट्रिंग कामगार केशरलाल दौलत पाटील उन्हात काम करत असताना अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या उष्माघाताने मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर घटनांमध्ये ३५ वर्षीय प्रवीण दत्तु मिस्तरी, ३६ वर्षीय श्रीकांत रमेश कोळी व ४० वर्षीय नंदू किशोर पाटील या तीन तरुणांचा उलटी, चक्कर यांसह इतर उष्माघात सदृश्य लक्षणांनी मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत असून भद्रावती तालुक्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भद्रावतीमधील मुरसा येथे एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला, तर भद्रावती शहरातील आंबेडकर चौकातील एका पडक्या घरात राहणाऱ्या ६० वर्षीय निराधार महिला पौर्णिमा विक्रम पेटकर यांचाही मृत्यू झाला. प्रचंड उष्णतेमुळे उष्माघात होऊनच या दोन्ही व्यक्तींचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमान सतत ४७ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात असल्याने नागरिक हैराण झाले असून, या वाढत्या उन्हाने प्रशासनाची चिंताही वाढवली आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि उपाययोजना

या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष (Heatstroke Wards) सज्ज करण्यात आले आहेत.

दुपारच्या वेळी (विशेषतः दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान) नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

रस्त्यावरील बेघरांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची सोय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Follow Us