
गेल्या वर्षाअखेरीस 30 डिसेंबरच्या आसपास अमरावतीच्या मेळघाटमध्ये एका 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. जादूटोण्याच्या संशयावरून तिला बेदम मारहाण करण्यात आली तसेच तिच्या गळ्यात चपलांची माळ घालून, तोंडाला काळंही फासण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेला लघवीही पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण गावात तिची धिंड काढण्यात आली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पीडितेच्या मुलाने आणि सुनेने याप्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांची निराशा झाली होती. त्यांनी 17 जानेवारी, शुक्रवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानतर या प्रकरणाला वाचा फुटली असून राज्यभरात खळबळ माजली.
आता याप्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. या घटनेनंतर रेहट्याखेड्या गावांतील पुरुष गावाबाहेर निघून गेले आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकार जाणून घेतला.
या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता, त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरु केली आहे, ज्यामुळे गावात प्रचंड दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे बाबू जामुनकर याची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात आली. या घटनेत आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनातर्फे आज गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. आता या सभेत काय निर्णय घेतला जातो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबरच्या आसपास ही घटना घडली. अमरावतीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी आणि सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावणारी ही भयानक घटना घडली होती. जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षांच्या एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर तिला गरम सळीने चटके देण्यात आले,मिरचीची धुरी दिली. तोंडाला काळं फासून तिला लघवी पाजण्याचा प्रयत्न झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही तर गावकऱ्यांनी त्या महिलेच्या तोंडाला काळं फासून संपूर्ण गावात तिची धिंड काढून तिला गावातूनच हाकलण्यात आलं. गावचा पोलीस पाटीलच या धिंड काढण्यामागे असल्याचे समोर आले होते.
आता या प्रकरणाची प्रशासनाने चौकशी सरू केली असून आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केल्याने गावातील पुरूष गावाबाहेर निघून जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान याप्रकरणी अमरावतीमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख हरीश केदार यांनी प्रतिक्रिया देत जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब असल्याचे म्हटले आहे. जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करणे, धिंड काढणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.