
आज राज्यात राजकीय धुळवड रंगली. सकाळपासूनच राज्यातील पुढारी एकमेकांना चिमटे काढत आहेत. काही शालीतून जोडी हाणत आहेत. ‘बुरा नो मानो होली है’ म्हणत, एकमेकांची उणेदुणे काढले तर राग मनात ठेवत नाही. आज आपल्या मनातील सल व्यक्त करून मोकळं व्हायचा दिवस, आज अनेक नेत्यांनी त्यांच्या मनातील बोल व्यक्त केल्याने राजकीय धुळवड रंगली आहे. त्यातच प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुद्धा काँग्रेसवर चांगलीच बोचरी टीका केली. त्यांनी काँग्रेसला असा आरसा दाखवला.
नाना पटोले यांच्या त्या ऑफरची चर्चा
काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. त्याची राज्यभर एकच चर्चा रंगली. आपला राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे या दोघांनी काँग्रेससोबत यावे, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. त्या दोघांनी अर्धा-अर्धा कालावधी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी ही ऑफर होती. त्यांनी होळीच्या निमित्ताने ही खास ऑफर ठेवली. त्यावर लागलीच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी होळीच्या शुभेच्छा देत, नानाभाऊंना चिमटा काढला. महायुतीचे नेते ऑफरसाठी काम करत नसल्याचे ते म्हणाले. होळीच्या निमित्ताने त्यांनी नाना पटोले यांना एक सल्ला सुद्धा दिला. काँग्रेसने पुन्हा जनतेचा विश्वास मिळवावा, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.
बच्चू कडू यांनी दाखवला आरसा
तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काँग्रेससह महायुतीला आरसा दाखवला. त्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे 20 आमदार आहेत, तर एक तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे असा इरसाल टोला पटोले यांना लगावला. जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, तोपर्यंत खाली कोणी हालणार नाही. कारण ईडीचे जे फटके आहेत, त्याची या सर्वांनाच भीती आहे, असा चिमटा त्यांनी महायुतीमधील नेत्यांना काढला. त्यामुळे काँग्रेसची ऑफर स्वीकारण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.
कर्जमाफीवरून सरकारला घेरले
धर्माच्या राजकारणामध्ये आघाडी असो किंवा युती असो, यांनी शेतकर्यांना चकनाचुर करून टाकलं, यांच्या रंगपंचमीमध्ये आमची रंगपंचमी लाल होतय, काळी गर्द झालेली आहे, असे आपबित्ती बच्चू कडू यांनी विषद केली. नेत्याच्या अंगावरचे कपडे असू देत किंवा पक्षाचे झेंडे असू देत, तो सगळा कापूस शेतातून आलेला आहे, तो शेतकरी मारला जातो, धर्माच्या नावावर मारला जातो, कधी फतवा काढून, तर कधी कटेंगे तो बटेंगे म्हणून हिंदू शेतकरीच मारतो, याच्यामध्ये हिंदू शेतकरीच करतो, सरकार दिलेल्या शब्द पाडत नाही, कर्जमाफीची घोषणा केली परंतु मुख्यमंत्र्यांना ती आठवत नाही. अजितदादांची आणि एकनाथ शिंदे यांची स्मरण शक्ती हरवल्याचा टोला कडू यांनी लगावला.