Navneer Rana : गोळीबाराच्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा पोलीस आयुक्तांवर संतापल्या, आरती सिंह भ्रष्टाचारी असल्याचा आरोप

| Updated on: Aug 12, 2022 | 8:23 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी (Navneet Rana) या गोळीबारानंतर अमरावतीच्या पोलिस (Amravati Police) आयुक्तांना थेट टार्गेट केलंय. तसेच पोलीस आयुक्तांवरती त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामुळे आता पोलीस आयुक्त विरुद्ध खासदार हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

Navneer Rana : गोळीबाराच्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा पोलीस आयुक्तांवर संतापल्या, आरती सिंह भ्रष्टाचारी असल्याचा आरोप
बनावट जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणा पुन्हा संकटात
Image Credit source: social media
Follow us on

अमरावती : गेल्या काही महिन्यांपूर्वीच अमरावतीत उसळलेल्या दंगली आणि त्यावरून पेटलेलं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे, दंगलीनंतर सुरू झालेले आरोप हे थांबायचं नाव घेत नव्हते, त्यानंतर आज पुन्हा अमरावती शहरात धक्कादायक प्रकार घडलाय. आज अमरावती शहरात खुलेआम गोळीबार (Amravati Firing) झाल्याची घटना घडलीय. एवढेच नाही तर या गोळीबारात एक 13 वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झालेली आहे. त्यानंतर आता अमरावतीतलं राजकारण हे पुन्हा पेटून उठलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी (Navneet Rana) या गोळीबारानंतर अमरावतीच्या पोलिस (Amravati Police) आयुक्तांना थेट टार्गेट केलंय. तसेच पोलीस आयुक्तांवरती त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामुळे आता पोलीस आयुक्त विरुद्ध खासदार हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

पोलीस आयुक्त भ्रष्टाचारी असल्याचा आरोप

अमरावतीत गोळीबारची घटना घडल्यानंतर या गोळीबारच्या घटनेबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. दोन वर्षात अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. आरती सिंग पोलीस आयुक्त झाल्या तेव्हापासूनच असे प्रकार घडायला लागलेत. असा थेट आरोप त्यांनी केला आहे. तसेच अमरावतीत विनापरवाना बंदूका आहेत. शहरांमध्ये खुलेआम गुन्हेगार फिरत आहेत, ही गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग या प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. आज जी  गोळीबाराची घटना घडली आणि गुन्हेगारी वाढलेली आहेत त्याला फक्त आणि फक्त पोलीस आयुक्त आरती सिंग या जबाबदार आहेत, पोलीस खुलेआम फिरणाऱ्या गुन्हेगारांवरांही कारवाई करत नाहीत, असा थेट आरोप नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला आहे.

अमरावतीत नेमकं घडलं काय?

अमरावतीत दोन तरुणांचा आधीपासूनच वाद होता. या वादातून ही गोळीबाराची घटना घडली आहे. दोघे तरुण हे अमरावतीतील एका चौकामध्ये आमने सामने आले. त्यावेळी एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर थेट  गोळी झाडली. मात्र यात त्याचा नेम चुकला आणि तेरा वर्षीय मुलगी जी तिथून चालली होती तिला ती गोळी लागली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि या गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही तरुण फरार झालेले आहेत. या आरोपींबाबतही पोलिसांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मागील काळात आपण अमरावतीचे महापालिका आयुक्त विरुद्ध राणा संघर्ष पाहिलेला आहे. आता या घटनेनंतर पोलीस आयुक्त विरुद्ध राणा संघर्ष रंगताना दिसून येत आहे.