‘जनतेच्या कष्टाच्या पैशांमधून…’ दमानियांचा तटकरेंवर निशाणा, फडणवीसांनाही टोला

अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे.

जनतेच्या कष्टाच्या पैशांमधून... दमानियांचा तटकरेंवर निशाणा, फडणवीसांनाही टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2025 | 6:42 PM

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.  जनतेच्या कष्टाने कमवलेल्या करायच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिपॅड? ती पण चार चार हेलिपॅड? अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया? 

अंजली दमानिया यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘जनतेच्या कष्टाने कमवलेल्या करायच्या पैशातून तटकरेंसाठी खास HELIPAD? ती पण चार चार Helipad? अमित शाह भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाह यांना जेवायला घालायचय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना ? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा देवेंद्र फडणवीसांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकार मधे खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय .’ असं दामानिया यांनी म्हटलं आहे.

 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अमित शाह यांच्यासाठी खास सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती.  या कार्यक्रमातील एका फोटोवरून देखील दमानिया यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत जोरदार हल्लोबोल केला आहे.  अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.