
मोठी बातमी समोर येत आहे, आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्याकडे काही कागदपत्रं सादर केले आहेत, तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
मी आज अजित पवार यांची भेट घेतली, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यासाठी त्यांच्या कानावर सर्व माहिती टाकली. या भेटीदरम्यान माझ्याकडे जे पुरावे होते, जे व्हिडीओ आणि कागदपत्रं होती ती अजित पवार यांना दाखवली. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक, व्यावहारिक संबंध आहेत? त्याविषयी त्यांना मी माहिती दिली आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
उद्या मुख्यमंत्र्यांची अजित पवार भेट घेणार आहेत त्यावेळी निर्णय होईल, असं मला वाटतंय धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असा मला आता विश्वास वाटत आहे. अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी माझा इगो सोडून आणि अजित दादांनी देखील स्वतःचा इगो सोडला आमची भेट झाली, त्यामुळे लवकरात लवकर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल. मी माझी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. राजकीय नेत्यांना भेटून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाई संदर्भात मागणी केली आहे. न्यायाधीशांना देखील पत्र लिहिलं आहे, तरी पण न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढाई सुरू राहील, असा इशारा यावेळी दमानिया यांनी दिला आहे.
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
आज दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतली, भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे की, मी अजित पवार यांच्याकडे बीडमधील कंपन्यांच्या बॅलेन्स शीट सादर केल्या आहेत. त्या शीटवर मुंडे पती-पत्नीच्या सह्या आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेल्या आर्थिक संबंधांची माहिती देखील मी अजित पवार यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.