
मोठी बातमी समोर येत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. या तीनही नेत्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे, त्यामुळे आता या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याच प्रकरणात आता न्यायालयानं मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणे, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीला आमदार निलेश राणे आणि रजन तेली तसेच इतर जण उपस्थित होते. मात्र यावेळी नितेश राणे यांच्यासह पाच जण सुनावणीवेळी न्यायालयात हजर नसल्यानं न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहत असल्यानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयानं यावेळी सुनावणीसाठी अनुपस्थित असलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज देखील नाकारला आहे. त्यामुळे आता नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.