
स्वत:ला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि अध्यात्माच्या नावाखाली काळं साम्राज्य उभं करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. गेल्या ७२ तासांत गुगल सर्च इंजिनवर अशोक खरात हे नाव सर्वाधिक शोधले जाणारे नाव ठरले आहे. तसेच गुगल ट्रेंड्समध्ये या प्रकरणाने ब्रेकआऊट श्रेणी गाठली आहे. १७ मार्चपर्यंत ज्या नावाचा इंटरनेटवर कोणताही मागमूस नव्हता ते नाव २० मार्चला सर्च स्कोअरच्या १०० या उच्चांकावर पोहोचले आहे.
गुगलवर प्रामुख्याने ५८ व्हिडीओ, खरात न्यूज आणि अशोक खरात बॅकग्राउंड या कीवर्ड्सचा शोध घेतला जात आहे. अशोक खरातच्या कार्यालयातील छाप्यात एका पेनड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. यामध्ये काही हाय-प्रोफाईल महिला, अधिकारी आणि सेलिब्रिटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या या प्रकरणाशी सर्वाधिक सर्च नाशिकमधील लोक करत आहेत. त्यानंतर संभाजीनगर, मुंबई आणि पुणे या शहरांतून या प्रकरणाशी संबंधित सर्च होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा उलगडा नाशिकमधील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून झाला. खरातने पीडित महिलेच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून तिला भीती घातली. पूजेच्या बहाण्याने त्याने तिला ओस्नो जल पाजून २०२२ ते २०२५ या काळात वारंवार अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, त्याने या कृत्याचे चित्रीकरण करून पीडितेचा छळ केल्याचाही आरोप आहे.
त्यासोबतच खरातने एका बड्या उद्योगपतीला एका महिलेच्या गरोदरपणाचे खोटे कारण सांगून तब्बल २० कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सिन्नर आणि शिर्डी परिसरात खरातच्या नावे असलेले ६० हून अधिक सातबारे जप्त केले आहेत. त्याच्या एकूण मालमत्तेचा आकडा २०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरात रिमोटवर चालणारा २० फुटी बनावट नाग दाखवून भक्तांना चमत्काराचा भास करून द्यायचा. त्याच्याकडे पिस्तूल, काडतुसे आणि वाघाचे कातडेही सापडले आहेत.
नाशिकच्या गौळाणे येथील एका शेतकऱ्याने खरातवर आपल्या भावाचा जमिनीच्या वादातून खून केल्याचा गंभीर आरोप केला असून त्याबाबत एसआयटीकडे तक्रार दिली आहे. अशोक खरातचे राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. सध्या एसआयटी त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि व्हिडीओमधील व्यक्तींची सखोल चौकशी करत आहे.