
मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला झाला आहे. पुण्यातील दिवे घाट परिसरात ही घटना घडली आहे. आदित्य हाके असं लक्ष्मण हाके यांच्या मुलाचे नाव आहे. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून संबंधित लोकांना अटक करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लक्ष्मण हाके यांचा मुलगा आदित्य हाके यांच्या मुलावर हल्ला कोणी केला याबाबत माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे सतत मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये असं हाके यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा तरुणांकडून तर हा हल्ला करण्यात आला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याआधी आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली होती. लक्ष्मण हाके हे निरा येथे आले होते, ते एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. ही माहिती तरुणांना मिळतातच हॉटेलच्या बाहेर येऊन तरुणांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतलं.
मनोज जरांगे यांच मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त आहेत. राज्य सरकारकडून जरांगेच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही त्यातच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांच्या विरोधात बोलत आहेत. यातूनच हाके यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला होता. यात मराठा तरुण आणि हाके यांच्यात तू-तू मै-मै झाली होती. यानंतर लक्ष्मण हाके यांनी माझ्यावर हल्ला झाला असा आरोप केला होता. तसेच आता आदित्य हाके यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.