Aurangabad | शहरातली 50 जातीवाचक वसाहतींची नावं बदलण्यास विरोध, 1042 नागरिकांचा आक्षेप, आंदोलनाचा इशारा

यात सामाजिक न्याय विभागाने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला असून तो रद्द करावा, अशी मागणी केली आहे. काहींनी तर वसाहतींची नावं बदलल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला आहे.

Aurangabad | शहरातली 50 जातीवाचक वसाहतींची नावं बदलण्यास विरोध, 1042 नागरिकांचा आक्षेप, आंदोलनाचा इशारा
औरंगाबाद महापालिका
| Updated on: Feb 10, 2022 | 9:40 AM

औरंगाबादः राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे (Social Justice Department) विविध शहरांमधील ज्या वसाहतींना जातीवरून (Caste based names) नावं देण्यात आली आहेत, ती नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत शहरे, वसाहती, तसेच रस्त्यांची नावंही बदलली जाणार आहे. या निर्णयानुसार औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad municipal corporation) शहरातील 50 जातिवाचक वसाहतींची नावं शोधून काढली होती. ही नावं बदलण्याची तयारीही सुरु करण्यात आली. मात्र या प्रक्रियेवर नागरिकांनीच आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे ही मोहीम रखडली आहे. सामाजिक न्याय विभागाने यासंबंधी काढलेला शासन निर्णयच रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नागरिकांचे मत विचारात घेतले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नावं बदलल्यास आंदोलनाचा इशारा

यासंदर्भात महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, शहरातील जातिवाचक वसाहती व रस्त्यांची नावं शोधण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना कळवले होते. त्यानुसार, प्रभाग अधिकाऱ्यांनी 50 वसाहतींची नावं वगळण्याची यादी सादर केली. मात्र त्यावर 1042 नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. यात सामाजिक न्याय विभागाने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला असून तो रद्द करावा, अशी मागणी केली आहे. काहींनी तर वसाहतींची नावं बदलल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला आहे.

कोणती नावं बदलणार होते?

मनपाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी जातीवाचक नावं असलेल्या काही वसाहतींची यादी केली असून त्यात डिंबर गल्ली, ब्राह्मण गल्ली, कुंभार गल्ली, मल्लावपुरा, बेगमपुरा, भिल्ल गल्ली, भिमनगर, भंगीवाडा, मांगवाडा (भावसिंगपुरा गाव) , चांभारवाडा (भिमनगर, भावसिंगपुरा गाव), बौद्धवाडा, मोमिनपुरा, लोटाकारंजा, माळीवाडा, चेलीपुरा येथील धोबीघाट, नवाबपुरामधील तेलंगवाडा गवळीपुरा, राजाबाजारमधील बोहरी कठडा, गुलमंडीमधील जोहरीवाडा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, नागेश्वरवाडीतील पारधीपुरा भोईवाडा, औरंगपुरा येथील बौद्धवाडा, सिल्लेखान्यातील कैकाडीवाडा, समर्थनगरातील भोईवाडा आदींचा वसाहतींचा समावेश आहे.

चंद्रपूरमध्येही नगरसेवकांचा प्रखर विरोध

दरम्यान, चंद्रपूरमध्येही जटपुरा गेट, पठाणपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूंच्या नावासह वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवी नावं देण्याच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. महापालिकेच्या आमसभेत डिसेंबर महिन्यात यासंबंधातला प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

इतर बातम्या-

Nashik Crime | नाशिकमध्ये तलवारी घेऊन गुंडांचा रस्त्यावर हैदोस, वाहनांच्या काचा फोडून मारहाण

CCTV | दुभाजक तोडून BMW विरुद्ध दिशेला, ट्रकवर धडकून कार उलटली, गोंदियात भीषण अपघात