
औरंगाबादः औरंगाबादेत एकिकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे तर दुसरीकडे मनसेतील नाराजांची गच्छंती सुरु आहे. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सुहास दाशरथे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी औरंगाबादचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेदेखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये मागील डिसेंबर महिन्यात जी सभा झाली होती, त्यावेळी सुहास दाशरथेंकडून पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. त्यानंतर दाशरथे गट नाराज होता.
राज ठाकरे यांची मागील डिसेंबर महिन्यात औरंगाबादमध्ये सभा झाली होती, त्याच वेळी सुहास दाशरथे यांच्याकडील जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आले होते. त्यावेळी पदावरील ही उचलबांगडी सुहास दाशरथे यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर सुहास दाशरथे यांच्या कार्यकर्त्यांवरही मनसेतील वरिष्ठ नेत्यांवर कारवाई झाली होती. समाज माध्यमांमध्ये मनसेची बदनामी केल्याचा आरोप दाशरथेंच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला होता. त्यानंतरही सुहास दाशरथे पक्ष सोडून जातील, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांनी प्रत्यक्षात तसा निर्णय घेतला नव्हता.
दरम्यान, सुहास दाशरथे यांनी राज ठाकरे यांच्या आगामी सभेपूर्वीच पक्षातून बाहेर पडत भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानावर त्यांचा भाजपात पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडदेखील उपस्थित होते.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचं वक्तव्य मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केलं आहे. मुंबईत आज शिवतीर्थ येथे मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेचे सर्व पदाधिकारी येत्या 28 एप्रिलपासूनच औरंगाबादेत दाखल होतील, असंही सरदेसाई यांनी सांगितले.