Aurangabad PHOTO | औरंगाबादेत हजारोंचा जल आक्रोश, महापालिकेवर धडकला भाजपचा मोर्चा, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आंदोलन..

| Updated on: May 23, 2022 | 6:41 PM

शहरातील विविध भागांमध्ये आठ ते दहा दिवसांनी एक तास पाणीपुरवठा केला जातो. ही मुख्य समस्या घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले.

Aurangabad PHOTO | औरंगाबादेत हजारोंचा जल आक्रोश, महापालिकेवर धडकला भाजपचा मोर्चा, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आंदोलन..
Follow us on

औरंगाबादः शहरातील पाणी प्रश्नानं (Water Issue) अधिकच गंभीर रुप धारण केलं असल्याने भाजपतर्फे सत्ताधारी शिवसनेला (Shiv Sena)  आणि राज्य सरकारमधील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धरण्यासाठी आज विराट मोर्चा काढण्यात आला. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. पैठण गेट परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात पाणी समस्येनं त्रस्त असलेल्या महिला व पुरुषांनी सहभागी होण्याचं आवाहन भाजपतर्फे करण्यात आलं होतं. त्यानुसार हजारोंच्या संख्येने महिला, शहरवासीय आणि भाजपचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. महाविकास आघाडी सरकारविरोधात आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली गेली. पैठण गेट परिसरात दुपारपासूनच जल आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांची गर्दी होणं सुरु झाली होती. पैठण गेट परिसरात या मोर्चाच्या निमित्तानं प्रचंड गर्दी जमली होती.

मोर्चासाठी औरंगाबादचे ज्येष्ठ भाजप नेते आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे तसेच शहराध्यक्ष संजय केणेकर आदींनी मोठी तयारी केली होती. मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांच्या हातात पाणी समस्येविरोधातील पोस्टर्स होते.

हे सुद्धा वाचा

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारं एक मोठं जायकवाडी धरण असूनही नियोजना अभावी शहरातील नागरिकांना अत्यंत तुटपुंजा पाणीपुरवठा केला जातो. शहरातील विविध भागांमध्ये आठ ते दहा दिवसांनी एक तास पाणीपुरवठा केला जातो. ही मुख्य समस्या घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले.

भाजपकडून महाविकास आघाडी आणि पाणी प्रश्न बिघाडी अशा आशयाचे पोस्टर्स तयार करण्यात आले. पाणी प्रश्नासाठी महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा जथ्था घेत देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड आणि आमदार अतुल सावे हे महापालिकेच्या दिशेने निघाले. यावेळी शिवसेनेविरोधातही मोठी घोषणाबाजी करण्यात आली.  पैठणगेट, गुलमंडी,  खडकेश्वर मार्गे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आणि महापालिका कार्यालय अशा मार्गाने भाजपाचा मोर्चा गेला.


संभाजी नगरच्या जनतेला पाणी न देता महाविकास आघाडी आणि महापालिकेतील शिवसेनेनं भावनेचं राजकारण केलं. आम्ही मंजूर केलेल्या पाणी योजनेला पूर्णत्वास नेऊ दिलं नाही. त्यामुळे संभाजीनगरच्या जनतेचा हा आक्रोश आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या मोर्चात घागरी घेऊन आलेला उंटही प्रतिकात्मक रित्या आणण्यात आला होता.

ज्यांनी जीवनात काहीच केलं नाही, केवळ भावनेचं राजकारण केलं, त्यांना हे नाटकच वाटेल, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.  सध्याची भ्रष्टाचार व्यवस्था बदलण्यासाठी हा मोर्चा असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हा फक्त भाजपचा मोर्चा नसून अवघ्या शहराचा पाण्यासाठीचा आक्रोश आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झाल्यावरचं छायाचित्र