
औरंगाबादः उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सभेपूर्वीच औरंगाबादेतील भाजप पदाधिकाऱ्यांना शहर (Aurangabad police) पोलिसांमार्फत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. पाणी प्रश्नावरून भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणी 20 ते 25 भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र या नोटिशीत (Police Notice) पोलिसांनी चुकीची भाषा वापरल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दबावाखाली पोलिसांनी कितीही नोटिसा बजावल्या तरीही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्यावर तुम्ही कितीही दडपशाही केली. ती निकामी ठरेल. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत सातत्याने जनमानसाच्या सेवेत उभे राहू तसेच आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ने उतरू, असा इशारा संजय केणेकर यांनी दिला.
औरंगाबादमध्ये 04 एप्रिलल लरोजी भाजपच्या चिश्तिया कॉलनीच्या जलकुंभावर आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र तेथे मनपाचे कर्मचारी नव्हते. त्यामुळे आंदोलक मनपाचे प्रशासकांच्या दिल्ली गेट येथील शासकीय निवासस्थानावर धडकले होते. त्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मोबाइल संदेशांद्वारे आज नोटिसा पाठवल्या.
”तुम्ही आडदांड व कोणतीही परवानगी नसताना अडथळा निर्माण करून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याचे स्वभावाचे दिसून येत असून आगामी काळात तुमच्याकडून सदर कारणावरून वाद होऊन त्यातून एखादा शरीराविरुद्धचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वाटते, वदैरे रिपोर्टमध्ये नमूद आहे. यावरून तुम्ही वरील प्रमाणे कृत्य केल्याबाबत आमची खात्री पटली आहे. तुमचेकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडून त्यातून तुम्ही रहात असलेल्या भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल, असे आमचे मत झाले आहे. त्यामुळे तुम्हाला हमीदाराशिवाय मोकळे सोडणे उचित वाटत नाही, असे पोलिसांच्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यावरच भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
शिवसेनेच्या या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाहीत, असा इशारा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ घाबरलेल्या तिघाडीने आता भाजपा पदाधिकाऱ्यांना नोटिसा देऊन सक्तीचे पोलीस स्टेशनला हजर राहणे असा फर्मान जारी केला. याचा अर्थ काय जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासन कोणाच्या दबावा खाली वागत असेल तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. तसेच जनसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. तरीही आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा इशारा संजय केणेकर यांनी दिला.