
औरंगाबादः आठ जणांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने बेदम (Young man beaten) मारून त्याचा जीव घेतल्याची (youth murder) घटना काल औरंगाबादेत घडली. मारहाणीच्या या घटनेने औरंगाबादमध्ये काल खळबळ माजली. ही मारहाण नेमकी का झाली यामागचं कारण कालपर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र घटनेचा पूर्णपणे उलगडा झाला असून अगदी किरकोळ कारणामुळे इतक्या क्रूरपणे जीव घेण्याचं कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. लाईट फोकस चोरल्याच्या संशयावरून वॉचमन असलेल्या या तरुणाचे हात पाय बांधून आठ जणांनी ठेचून मारल्याचं समोर आलं आहे. 20 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत मनोज शेषराव आव्हाड याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी सात आरोपींना (police arrest) बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसरा, आरोपी सागर आणि सनी ही दिवंगत गणपत खरात यांची मुलं आहेत. खरात यांनी महापालिकेकडून मेघावाले सभागृह भाड्याने घेतले आहे. मनोज तेथे वॉचमन होता. चार दिवसांपूर्वी तेथे कार्यक्रमातून महिलेचा मोबाइल चोरीला गेला. तो मनोजने चोरल्याचा संशय होता. मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तेथून लाइट फोकस चोरीला गेले. मनोजला बुधवारी दुपारी आरोपींनी घरून मेघावाले हॉलमध्ये नेले. तेथे चोरीची कबुली देण्यासाठी त्याला मारहाण केली. तो मान्य करत नसल्याने त्याचे हात पाय बांधले आणि लाकडी दांड्याने त्याला ठेचत राहिले. या मारहाणीत तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला घाटीत नेऊन टाकले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आणखी धक्कादायक माहिती समोर आली. मनोजची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याचे फाटलेले कपडे, रक्ताचे डाग पाहून डॉक्टरांना संशय येऊ नये म्हणून त्याला स्नान घातले. रक्ताचे डाग स्वच्छ पुसून दुसरे कपडे चढवले आणि नंतर घाटी रुग्णालयात नेले. आरोपींनी मनोजला घाटीत दाखल केले. डॉक्टरांना ही व्यक्ती जळगाव रोडवर बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगितले. त्यांनी त्याचे नाव आणि गावही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी अनोळखी तरुण अशीच नोंदणी सुरुवातीला केली.
चोरीच्या संशयावरून माणुसकीलाही लाजवेल एवढ्या क्रूरपणे मनोजची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे औरंगाबाद हादरला आहे. विशेष काही मारेकरी मारत असताना इतर आरोपींनी या घटनेचे व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे घटनेतील क्रौर्य अधिकच ठळकपणे दिसून आले.
इतर बातम्या-